Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार कधीही कोसळेल, असे विधान केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार हे लवकरच समजेल.
रोहित पवार म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न असतानाही मंत्रीमंडळाचा विस्तार करीत नसल्याचा आरोपही सरकारवर होत आहे. सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि बाजारभावाचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यावर शिंदे-फडणवीस सरकार वारंवार नाफेडने खरेदी सुरू केल्याचे सांगतात, मात्र तशी कोणतीही कार्यवाही सुरू झाली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांचा घेरताना दिसत आहेत. शिवसेना आणि भाजपमधून मंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी सरकार धजावत नाही.
दरम्यान, याचा परिणाम राज्यातील अनेक योजनांवर झाला आहे. मंत्री नसल्याने योजना अडकून पडल्या आहेत. राज्यातील पोटनिवडणुकींचा निकाल हा शिंदे-फडणवीस यांच्या विरोधात लागला आहे. तसेच निवडणूक आणि सरकारबाबत जे सर्व्हे येत आहेत ते राज्य सरकारच्या विरोधात जात असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे नागरिकांची भावना व सर्वे पाहता हे सरकार किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. राज्यात झालेल्या विधानपरिषद आणि पोटनिवडणुकीचा निकाल शिंदे-फडणवीस सरकारविरोधात गेला आहे. याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसेल, असेही पवार म्हणाले.