Sangamner Vidhansabha Nivdnuk : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल कधीच वाजलेत. आज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक. आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बाकी राहिलेल्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आपले अधिकृत अर्ज सादर केले जाणार आहेत.
यंदाची निवडणूक ही 2019 च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतर सर्वप्रथम विधानसभेच्या निवडणुका होत असून यामुळे यंदाची निवडणूक ही गेल्या निवडणुकीपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचे जाणकार सांगतात.
यंदाच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना रंगणार आहे. खरंतर राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक काटेदार होणार आहे. मात्र संगमनेर विधानसभा मतदारसंघाची गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चा आहे.
फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे. चर्चेचे कारण म्हणजे या मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे पाटील आव्हान देणार असे म्हटले जात होते.
विशेष म्हणजे डॉ. विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केले होते. त्यांचे वडील राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसलें.
विखे पिता-पुत्र गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात जोरदार फिल्डिंग लावत होते. मात्र, शेवटच्या क्षणी ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली. तसेच, शिवसेना शिंदे गटाने अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केलीय.
यामुळे सुजय विखे पाटील यांचा निवडणुकीतून पत्ता कट झाला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीतून सुजय विखे पाटील यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे म्हणालेत की, ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला.
ही जागा अगदी शेवटच्या दिवशी जाहीर करण्यात आली. नगर जिल्ह्यात कोणती जागा कोणाला जाईल, अशा अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. महाराष्ट्रात 8 ते 10 जागा शेवटच्या टप्प्यात उरल्या होत्या.
या जागांबाबत वरच्या स्तरावर वाटाघाटी झाल्या. यानुसार, संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला देण्यात आलीये. महायुतीने दिलेल्या उमेदवाराचे वैशिष्ट्य असे आहे की, मागच्या पाच वर्षात त्यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक कामे केली आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार आम्ही तिथे दिला आहे. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा काय करून दाखवू शकतो हे 23 तारखेला कळेल, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.