मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेनेच्या भावना गवळी यांच्या जागी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. याचे कारण आता संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.
व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद पदाचे महत्त्व फार असते. पुढच्या अडीच वर्षात अनेक निर्णय होतील. कामाला गती मिळायला हवी. भावना गवळी उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही कायदेशीर लढायांमुळे त्यांना दिल्लीत संसदेत उपस्थित राहाता येत नाही असे अनेकदा दिसले. अशा वेळी तिथे संसदेत मुख्य प्रतोद म्हणून व्यक्ती उपस्थित राहणे आवश्यक असते. काही आदेश काढायचे असतात, काही व्हीप काढायचे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, विधानसभेतील प्रतोदपदावरून शिवसेना आणि बंडखोर आमदार गटामध्ये मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला होता. शिंदे गटाने प्रतोद बदलल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागला होता.