Satyajit Tambe : काही दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष आमदार सत्यजित तांबे हे निवडून आले. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर अनेक आरोप केले. यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीवरून काँगेसमध्ये दोन उभे गट पडले.
असे असताना आता अधिवेशन सुरू असताना तांबे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, मला निवडणूक लढण्याची परिस्थिती निर्माण झाली, त्याचे सर्व श्रेय देवेंद्र फडणवीस यांना आहे. या सभागृहात मी कसा आलो याचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
माझ्या वडिलांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. माझ्या मामांनी बाळासाहेब थोरात यांनी याठिकाणी मोठे काम केले आहे. तांबे यांनी फडणवीस यांचे नाव घेतल्याने आता चर्चा सुरू आहे. अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे भाजप की मूळ पक्ष काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा रंगली होती.
तसेच तांबे यांनी शिंदे गटात प्रवेश केला का? अशी चर्चा सुद्धा सुरू झाली होती. त्यामुळे ही नव्या राजकारणाची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, पदवीधर निवडणुकीत अपक्ष सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला होता.
यानंतर काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या होत्या. बाळासाहेब थोरात यांनी देखील राजीनामा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर यावेळी आरोप करण्यात आले होते. यामुळे काँग्रेसमध्ये सर्व काही ठीक नसल्याचे दिसून आले. यामुळे सत्यजित तांबे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.