Satyajit Tambe On Pune Nashik Railway : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे. मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिक आणि पुण्याचे मोठे योगदान आहे. पण, स्वातंत्र्यानंतर जवळपास आठ दशकांचा काळ उलटल्यानंतरही पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने कनेक्ट व्हावी अशी नागरिकांची इच्छा आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक ते पुणे दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी पक्षाने हा मार्ग महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातून अर्थातच शिर्डी मधून घेऊन जाण्याचा घाट घातला आहे.
या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केला जाणार असे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले आहे. परंतु या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करण्याचा मनसुबा शासनाने जाहीर केला असल्याने सत्यजित तांबे चांगलेच आक्रमक बनले आहेत.
या मार्गाच्या मुळ आराखड्यात बदल झाला तर रस्त्यावर उतरून जोरदार विरोध करू असा इशाराच तांबे यांनी यावेळी दिला आहे. हा मार्ग गेल्या चार वर्षांपासून अडकला आहे. अशातच आता या मार्गाच्या नकाशात बदल करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.
नाशिक-पुणे रेल्वे आता शिर्डी मार्गे नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार आहे. शिर्डी हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात येते. पण, हा मार्ग शिर्डी वरून घेऊन जाण्यास सत्यजित तांबे यांनी विरोध दाखवला आहे. या मार्गात बदल झाला तर या मार्गाचा उद्देश आणि मूळ आराखडा बाधित होईल असे त्यांनी म्हटले आहे.
या निमित्ताने नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे असे चित्र पाहायला मिळत आहे. खरे तर हा मार्ग नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर मार्गे पुणे असा प्रस्तावित मार्ग होता. नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे या प्रस्तावित मार्गाने नेल्यास अनेक भागात सह्याद्रीच्या डोंगरातून बोगदे तयार करावे लागणार आहेत.
यामुळे या प्रकल्पाचा खर्च वाढू शकतो. मात्र शिर्डी वरून जर हा मार्ग गेला तर प्रकल्पाचा खर्च कमी होऊ शकतो असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. तथापि, मध्य रेल्वेच्या या दाव्यानंतर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. या विरोधात सत्यजित तांबे यांनी आवाज बुलंद केला आहे.
हा प्रश्न त्यांनी विधिमंडळात देखील उचलून धरला होता. तसेच राज्य शासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी म्हटले आहे. जर नाशिक-पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेच्या प्रस्तावित मार्गात बदल झाला आणि याबाबत तातडीने शासनाने कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला आहे.
यानिमित्ताने सत्यजित तांबे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांची मागणी ओळखून राजकीय नस पकडली असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. यामुळे याचा सत्यजित तांबे यांना फायदा होणार आहे. वास्तविक, या प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गानुसार रेल्वे संगमनेर मार्गे जाणार आहे. संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ आहे. पण, सत्ताधारी पक्षाने हा मार्ग शिर्डीवरून घेऊन जाण्याचा चंग बांधला आहे.
शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. यामुळे आगामी काळात या प्रकल्पावरून थोरात विरुद्ध विखे पाटील अशी राजकीय लढत पाहायला मिळू शकते. मात्र या राजकीय लढतीचा या रेल्वे प्रकल्पाला काही फायदा होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.