Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 10 मार्चला अहमदनगर दौऱ्यावर जाणार आहेत. असे असताना आता हा दौरा वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे पवार यांच्या या दौर्याला पारनेर कारखाना बचाव व पुर्नर्जीवन समितीने कडाडून विरोध केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे.
जवळा येथे उद्धाटन व शेतकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी देखील झाली असली तरी आता पवार येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दौऱ्याआधीच ‘शरद पवार गो-बॅक’ असे म्हणत समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हा वाद सुरू होण्याची कारण म्हणजे पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप बचाव समितीने केला आहे. यामुळे पवार यांना येथे उपस्थित राहण्यासाठी विरोध केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
पवारांनी अनेक कारखान्यांचे खाजगीकरण केल्याचा आरोप अनेकदा विरोधक करत असतात. तसेच शरद पवार यांना पारनेर बचाव समितीने एक पत्र लिहीले आहे. या पत्रात पारनेर कारखाना विक्रीबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. तसेच या प्रश्नांची उत्तरे दिली तरच त्यांना पुढे फिरू दिले जाईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, पारनेर साखर कारखान्याची विक्री चुकीच्या पद्धतीने करुन शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे माजी खासदार विदुरा नवले तो बळकावला, असेही म्हटले जाते आहे. तसेच यासाठी पवारांनी त्यांना मदत केली असल्याचा पुरावा देखील समितीकडे आहे, असे समितीचे म्हणणे आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.