Sharad Pawar : सध्या राज्यात महाविकास आघाडीने भाजप विरोधात एकत्र येत आता राज्यभर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील यांच्यासह बडे नेते उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे भाषण करत असताना एक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो, अशी घोषणाबाजी केली. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील लगेच प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यास काहीही हरकत नाही. पण आधी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा. आधी गावपातळीवर एकत्र येऊन दाखवा. आम्ही नेतेमंडळी तर भेटत असतो. पण तुम्हालाही गावपातळीवर तिन्ही पक्षाला एकत्र भेटाव लागेल.
आपण जर लढणार असू आणि लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर असेल तर पहिली शपथ घ्या. येथे आपल्या पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल. पण ग्रामपंचायत असो वा एखाद्या सोसायटीची निवडणूक असो भाजपा आणि मिंधे गटाबरोबर युती करायची नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून होणार आहे. येथील सभा यशस्वी करण्याची जबाबदारी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.