Sharad Pawar News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा तारखांची घोषणा केली आहे. यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये सध्या जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहणार या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात राजकारण होताना दिसते.
महाविकास आघाडी बाबत बोलायचं झालं तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळी विधाने समोर आली आहेत. अशातच आता महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे एक विधान विशेष चर्चेत आले आहे.
शरद पवारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहू शकतो या संदर्भात एक सूचक विधान केले आहे. खरे तर महायुतीने एक पत्रकार परिषद घेत महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले होते. याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण राहणार असा प्रश्न विचारला होता.
त्याला उत्तर देताना महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा लगेच आम्ही आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा सार्वजनिक करू असे म्हटले होते. दरम्यान फडणवीस यांच्या या विधानानंतर शरद पवार यांनीही एक सुचक वक्तव्य केले आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांचा पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य यात्रा काढली होती. या यात्रेचा समारोप नुकताच संपन्न झाला असून याचवेळी बोलताना शरद पवार यांनी, ‘राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि राजकीयदृष्ट्याही राज्याने प्रगती करण्यासाठी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सध्याच्या घडीला महाराष्ट्राचा कारभार चुकीच्या हातांमध्ये आहे. त्याचा फटका सगळ्या राज्याला बसला आहे. महाराष्ट्राची जी प्रतिमा महायुतीमुळे मलीन झाली आहे ती सुधारण्याची आवश्यकता आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या काळात जसा महाराष्ट्र होता तसा महाराष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे. राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करु शकतात याची मला खात्री आहे,’ असं सूचक विधान केले आहे. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का ? अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.