Sharad Pawar On Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. येत्या काही दिवसांनी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुका या 26 नोव्हेंबरच्या आधीच म्हणजेच विधानसभा विसर्जित होण्यापूर्वीच होतील असे निवडणूक आयोगाने आधीच स्पष्ट केले आहे.
यावरून नोव्हेंबरमध्ये यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटांमध्ये म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप हे जवळपास अंतिम टप्प्यात आले असून लवकरच दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
मात्र यंदाची निवडणूक महा विकास आघाडी कोणाच्या चेहऱ्यावर लढवणार आहे? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? असे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जात आहेत. स्वतः महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या ठाकरे गटाने मविआने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा आम्ही पाठिंबा देऊ असे अनेकदा म्हटले आहे.
मात्र ठाकरे गटाच्या या भूमिकेच्या उलट शरद पवार गट आणि काँग्रेसची भूमिका राहिली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होईल असे या दोन्ही गटांनी स्पष्ट केले आहे. अशातच मात्र राजकारणातील चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांचे एक विधान चर्चेत आले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे. यामुळे मात्र राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल शरद पवार हे नगर दौऱ्यावर होते. यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले.
दरम्यान याच लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना शरद पवारांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याबाबतचा किस्सा सांगितला, सोबतच त्यांनी रोहित पवारांबाबत देखील मोठे विधान केले.
शरद पवार काय म्हणालेत?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल रोहित पवार यांच्या मतदारसंघात बोलतांना ते मुख्यमंत्री पदापर्यंत कसे पोहोचलेत याबाबतचा किस्सा सांगितला. ते म्हटलेत की, ते कधी मंत्री झाले नाहीत, त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. रोहित पवार यांच्या बाबतही तसेच आहे.
रोहित पवार कधीच पक्षाकडून पदाची अपेक्षा ठेवत नाहीत. मी सुद्धा पाच वर्ष मंत्री नव्हतो. पण आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मला सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, मग कृषी खात्याचा राज्य मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली.
पुढे मला वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री होण्याची मोठी संधी प्राप्त झाली. महत्त्वाचे म्हणजे मी एकदा नाही तर चार वेळा मुख्यमंत्री झालो, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा किस्सा सांगितला. मात्र हा किस्सा सांगत असताना त्यांनी रोहित पवार यांच्यासोबत याचे कनेक्शन जोडले.
ते असे म्हटलेत की, रोहितचीही पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राच्या सेवेसाठी असणार आहेत. तसेच, ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशा प्रकारची राहणार असे सुद्धा त्यांनी यावेळी नमूद केले.
यामुळे रोहित पवार हे महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत की काय अशा चर्चांना आता नगरमध्ये उधान आले आहे. फक्त नगरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. खरे तर शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाते.
ते कोणतेही विधान सहजासहजी करत नाहीत ही बाब या ठिकाणी विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. यामुळे शरद पवार यांच्या या विधानावरून जर महाविकास आघाडी सत्तेत आले तर शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.