राजकारण

सहकारी पक्षांना सोबत घेणार – शरद पवार

Ahmednagar News : ‘इंडिया’ आघाडीच्या माध्यमातून ठरावीक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन यापुढे धोरण ठरवले जाणार आहे.

येत्या निवडणुकीत सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा विश्वास खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात समारोपाच्या भाषणात खासदार पवार बोलत होते. मंचावर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

पवार म्हणाले, भाजप ४०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असे सांगतो. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, पंजाबमध्ये भाजप नाही. गोवा, मध्य प्रदेशातील सरकार भाजपने पाडले.

४१५ म्हणा किंवा ५०० म्हणा, आज देशात भाजपला अनुकूल वातावरण नाही. जनमानसातून योग्य पर्याय दिला, तर त्यास जनतेचा नक्की पाठिंबा मिळेल, शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा दावाही त्यांनी केला.

मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ होते. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का होण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची यंत्रणा होती, तसे काम भाजपने सुरू केले असल्याचे पवार यांनी म्हटले.

खासदार पवार पुढे म्हणाले, भाजपने फसवणूक केल्याचे लोकांना समजू लागले आहे. आपल्या हातात सत्ता आल्यानंतर भाजपने अनेक घोषणा केल्या; मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. जनतेची केवळ फसवणूक केली. आता हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे.

एखाद्या धोरणाबाबत अशी मांडणी करतात की खासदार थक्क होऊन जातात. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन दिले; मात्र तसे झाले नाही. शहरी भागातील लोकांनाही घरे दिली नाहीत. शेतकऱ्यांकडेही सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. संसदेत काही तरुण घुसले, त्यांच्या हातात गॅसच्या कांड्या होत्या.

त्यांना पकडले गेले, त्याबाबतची माहिती खासदारांनी विचारली म्हणून १४६ खासदारांना संसदेतून निलंबित केले. बेरोजगारी, महागाई हे सर्वसामान्य नागरिकांचे विषय आहेत. गॅस दर ११०० रुपये झाला आहे. अन्नधान्य महाग झाले आहे. भारतातील ५४ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत.

लोकसंख्या वाढत आहे. एका बाजूने शेतमालाला किंमत द्यायची नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर बंधने आणायची, परिणामी जनता अडचणीत आली आहे. शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा आरोपही खासदार पवार यांनी केला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts