Ahmednagar Politics : राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर गेलेले पक्षाचे पदाधिकारी, नेते यांच्या व्यतिरीक्त पवार साहेब व राष्ट्रवादीचा विचार माणणारे जे गावोगावचे नेते,
पदाधिकारी शिल्लक आहेत, त्यांच्या भेटी गाठी घेऊन पवारांनी पहिल्या फळीतील गेले, तरी दुसऱ्या, तिसऱ्या फळीतल्या नेते, पदाधिकाऱ्यांना संधी देत आगामी राजकारणाची रणनीती आखणार असल्याचे संकेत दिले आहेत.
चार दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादीच्या शिबिरासाठी नगर जिल्ह्यात आले होते. याच दौऱ्यात त्यांनी आश्वी बुद्रुक येथील रिपाइंचे पदाधिकारी बाळासाहेब गायकवाड यांचा गौरव करीत आश्वीमध्ये शेतकरी मेळावा घेतला.
त्यानंतर अचानक पवार यांनी राष्ट्रवादीचे जुने पदाधिकारी अरूण कडू पाटील यांच्या घरी जाण्याचे निमंत्रण स्वीकारले. लगेच पवारांचा फौजफाटा दुपारी सात्रळमध्ये दाखल झाला. कडू पवार यांचे प्रवरा परिसरातील विश्वासू पदाधिकारी असून ते कट्टर विखे विरोधक असल्याने भविष्यात राष्ट्रवादीच्या आगामी निवडणुकांमध्ये त्यांना संधी मिळू शकते.
याच अनुषंगाने जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी पवार यांनी दौऱ्यात नसतानाही कडू पाटलांचे आमंत्रण स्वीकारून थेट त्यांच्या वस्तीवर जात चहा-पाणी घेतले. पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच कडू गेली २३ वर्षे रयतच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी होते.
हृदय शस्त्रक्रियेनंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती. तरीही पवार यांच्या आग्रहामुळे त्यांची पुन्हा रयतच्या उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. सात्रळ परिसरात शरद पवार आजपर्यंत आले ते केवळ अरूण कडू यांच्या आमंत्रणामुळे.
कडू यांचे वडील कॉम्रेड पी. बी. कडू पाटील यांच्या अमृतमहोत्सवी समारंभासाठी पवार आले होते. त्यानंतर कॉम्रेड कडू यांच्या निधनानंतर प्रथम स्मृतिदिनाच्या कार्यक्रमातही पवार यांनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांनी पुन्हा कडू यांच्या घरी येत त्यांच्याशी चहा-पाण्याच्या निमित्ताने स्थानिक राजकारण व शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली. पवार यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संवादामुळे राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना बळ मिळाले आहे.
कदाचित विधानसभा, लोकसभेत राष्ट्रवादीच्या वतीने पवारांकडून या जुन्या जाणत्यांना पुन्हा मैदानात उतरवले जाऊ शकते. नगर जिल्ह्याचा विचार करता अरूण कडू पटलांना अशा वेळी मोठी संधी मिळू शकते, असे संकेतच पवार यांनी या दौऱ्यातून दिले असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे.