राजकारण

शिर्डीत महाविकास आघाडीकडून ‘हा’ उमेदवार मैदानात उतरणार ? पण, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणे सोपे नाही ! कारण……

Shirdi News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर निवडणूक आयोगाने नुकत्याच निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.

पण, या दोन्ही गटांकडून अजून उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठीही अजून महायुतीने आणि महाविकास आघाडीने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाही. परंतु सलग सहा वेळा शिर्डी मधून आमदारकी भूषवलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा शिर्डीतन उमेदवारी करताना दिसणार हे 100% फिक्स आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ म्हटलं म्हणजेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील म्हणजेच शिर्डी असं या विधानसभा मतदार संघाचे राजकीय समीकरण आहे. त्यामुळे महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील यांनाच उमेदवारी मिळणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी कडून अजून या जागेवर उमेदवार ठरलेला नाही.

पण विखे यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी यावेळी स्वतः बाळासाहेब थोरात यांनी कंबर कसली आहे. विखे यांचे कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांना यावेळी महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. घोगरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांच्या परिवारासमवेत चांगले संबंध आहेत.

यामुळे घोगरे यांचे नाव महाविकास आघाडीकडून सर्वात जास्त चर्चेत आहे. यामुळे यंदा विखे विरुद्ध घोगरे असा सामना पाहायला मिळणार आहे. पण, विखे यांच्या बालेकिल्लाला सुरंग लावणे फारच अवघड आहे. खरेतर लोकसभा निवडणुकीत मंत्री विखे यांच्या सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा नगरदक्षिणमधून पराभव झाला आहे.

शिर्डी लोकसभेची जागा देखील महायुतीच्या हातातून गेली आहे. यामुळे महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा करिष्मा होऊ शकतो अशी आशा लावून बसली आहे. यामुळे शिर्डीतही गत सहा टर्मपासून आमदारकी भूषवलेल्या मंत्री थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार उतरवण्यासाठी आघाडीने कंबर कसली आहे.

पण, थोरात यांनी आपल्या बालेकिल्ल्याला गत काही दिवसांमध्ये अक्षरशः पिंजून काढले आहे. थोरात यांनी शिर्डी समवेतच उत्तरेतील आणि दक्षिणेतील सर्वच मतदारसंघ हळूहळू पिंजून काढायला सुरुवात केली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा मोर्चाचा फटका महायुतीला बसला होता.

यामुळे यावेळी असा फटका आपल्याला बसू नये यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे विखे पाटील यांची शिर्डी मध्ये फारच मजबूत पकड आहे. त्यांना मानणारा एक मोठा गट शिर्डी विधानसभा मतदारसंघासहित संपूर्ण जिल्ह्यात पाहायला मिळतो. विखे कुटुंब हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक जुने राजकीय कुटुंब. आशिया खंडातील पहिला साखर कारखाना नगरमध्ये विखे कुटुंबानेचं आणला आहे.

पिढ्यानपिढ्या विखे कुटुंबाचा नगरचा राजकारणावर वरचष्मा राहिला आहे. विखे कुटुंबाशी एकनिष्ठ असणाऱ्या मतदारांची संख्या शिर्डीमध्ये फारच अधिक आहे. शिवाय त्यांनी शिर्डीमध्ये केलेली विकास कामे खूपच वाखाण्याजोगी आहेत. दुसरीकडे त्यांनी लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात आणि नगर दक्षिण मध्ये स्वतः आपल्या पुत्राचा पराभवाचा वचपा करण्यासाठी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.

त्यांची स्वतःची एक विशेष यंत्रणा देखील निवडणुकीच्या काळात सक्रिय होत असते. ही यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व, तसेच महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेले निर्णय त्यांच्यासाठी जमेच्या बाजू सिद्ध होत आहेत.

एकीकडे महाविकास आघाडीचा अजून उमेदवारच ठरलेला नाही तर दुसरीकडे मंत्री विखे यांनी संपूर्ण मतदारसंघात पोहोचत मतदारांशी संवाद साधत मतपेरणीच्या कार्यक्रमाला कधी सुरुवात केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत मंत्री विखे पाटील यांची आघाडी पाहायला मिळते. हेच कारण आहे की विखे पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवणे म्हणजे फारच अवघड वाटते, असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts