Shrigonda News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल नुकताच वाजलाय. निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या असून महाविकास आघाडी आणि महायुती आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी करत आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून ठरलेले नाही मात्र महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली असल्याचे दिसते.
आज महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश असून यामध्ये काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
भाजप नेहमीच धक्का तंत्राचा अवलंब करत असते. आज जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या बाबतीत देखील भाजपाने असेच धक्कातंत्र अवलंबले आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील यावेळी भाजपाने नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे. आज जाहीर झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पहिल्या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे.
शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून यावेळी प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना उमेदवारी दिलेली नाही. यावेळी येथून ज्येष्ठ नेते भाजप आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
श्रीगोंदा मतदार संघातून त्या पहिल्यांदाच आमदारकीला समोरे जाणार आहे. बबनराव पाचपुते वयोमानानं थकल्याने आणि आजारपणामुळं भाजपने त्यांच्याच पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी दिली आहे.
खरे तर बबनराव पाचपुते यांच्या मुलाला किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. दरम्यान, आज भारतीय जनता पक्षाने येथून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाचपुते यांची या मतदार संघावर चांगली पकड आहे. प्रतिभा पाचपुते या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. त्यांचा राजकीय अनुभव आता आमदारकी लढवताना उपयोगी ठरणार आहे.
एकंदरीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून यावेळी भारतीय जनता पक्षाने आपला भिडू चेंज केलाय. तथापि, प्रतिभाताई पाचपुते यांची या मतदारसंघात मजबूत पकड असल्याने त्याचा फायदा पक्षाला होणार आहे.