Shrigonda News : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेले दिसते. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात तेव्हापासून इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या जागेवर महायुतीकडून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा राहणार आहे.
बीजेपी या जागेवर पाचपुते कुटुंबाला पुन्हा संधी देणार आहे. यामुळे मात्र विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा उराशी बाळगून बसणाऱ्या अनुराधा नागवडे कमालीच्या अस्वस्थ झाल्या असून त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. नागवडे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत.
मात्र लवकरच नागवडे यांचा पक्ष बदलणार आहे. महाविकास आघाडी कडून तिकीट मिळावे यासाठी नागवडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आघाडी मधील सर्वच प्रमुख नेत्यांची भेट घेतली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याशी नागवडे यांनी उमेदवारी बाबत सखोल चर्चा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागवडे यांना महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गट उमेदवारी देऊ शकते. ते ठाकरे गटात डेरे दाखल होतील आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर होईल अशा चर्चा सध्या श्रीगोंद्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. उद्या याबाबतचा निर्णय होणार आहे.
मात्र ठाकरे गटात शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचे नाव आघाडीवर आहे. तथापि उद्या या जागेवर ठाकरे गट पाचपुते यांना उमेदवारी देणार की नागवडे यांना उमेदवारी देणार याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने देखील या जागेसाठी दावा ठोकला आहे.
राहुल जगताप यांनी ही जागा शरद पवार गटालाच मिळणार असा दावा केला असून जर वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला तरी देखील आपण थांबणार नाहीत. आपण निवडणूक लढवणारच आणि जिंकणारच असे म्हणत अपक्ष का होईना पण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे नागवडे यांनी उद्या मेळावा बोलावला आहे. त्यांनी वांगदरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला आहे. दरम्यान राजकीय विश्लेषकांनी ठाकरे गटाकडून पाचपुते यांच्या ऐवजी नागवडे यांना उमेदवारी देण्यावर निर्णय होईल आणि याच पार्श्वभूमीवर उद्या हा मेळावा घेतला जात असल्याची माहिती दिली आहे.
तथापि याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे उद्या ठाकरे गट पाचपुते यांना उमेदवारी देणार की नागवडे यांना हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खरे तर दिवंगत शिवाजीराव बापू नागवडे यांनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये घालवली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात कधीच पक्ष बदलला नाही.
राजकीय नेते कसे असावेत, राजकीय नेत्यांनी पक्षनिष्ठा कशी जोपासले पाहिजे याचे धडे शिवाजीराव बापू नागवडे यांनी दिलेत. मात्र गत काही वर्षांमध्ये नागवडे कुटुंबाने जी भूमिका घेतली आहे, जेवढे पक्ष त्यांनी बदलले आहेत या सर्व गोष्टी पाहिल्या असता दिवंगत शिवाजीरावांच्या कुटुंबाला त्यांचा वारसा, त्यांच्यासारखी निष्ठा जपता आली नाही असेच म्हणावे लागेल. त्याचे कारण म्हणजे नागवडे यांनी 2009 साली भाजपामध्ये प्रवेश घेतला.
भारतीय जनता पक्षाने त्यांना 2009 ला विधानसभेचे तिकीट दिले त्यात ते पराभूत झालेत. त्यानंतर त्यांनी घर वापसी केली. पुढे 2019 मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी अचानक भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. बबनराव पाचपुते हे त्यांचे परंपरागत राजकीय विरोधक असताना देखील त्यांनी 2019 मध्ये त्यांच्यासाठी काम केले.
त्यानंतर पुन्हा ते काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसू लागलेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश न घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. नागवडे सध्या अजित पवार गटातच आहेत, मात्र विधानसभा निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षीपोटी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरूचं ठेवले आहे.