Shrirampur Politics Bhausaheb Kamble Golibar : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून एक अतिशय खळबळ जनक बातमी समोर येत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या मतदानाच्या पूर्वीच श्रीरामपूर मतदारसंघात एक मोठी धक्कादायक घटना घडली.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी उभे असलेले शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की काल रात्री मातापुर येथून मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत असताना कांबळे यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला.
दोन दुचाकी वर असणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोरच कांबळे यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या गेल्यात. परंतु या घटनेत कांबळे थोडक्यात बचावले आहेत.
हल्लेखोरांचा निशाणा चुकला आणि गोळ्या गाडीला न लागता हवेत गेल्यात आणि म्हणूनच आपण बचावलोत अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे सध्या मतदारसंघात मोठी खळबळ माजली असून कांबळे यांच्या समर्थकांकडून या घटनेचा निषेध व्यक्त होतोय.
कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘मी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर अज्ञात व्यक्तीने माझ्यावरती, माझ्या गाडीवर गोळीबार केला. म्हणून मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला माझी केस नोंदवायला आलोय.
या मतदारसंघाचा मी उमेदवार आहे आणि असं असूनही असं घडलं हे फारच कठीण आहे,’ असे मत कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान या साऱ्या प्रकरणात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्याने वेगवेगळ्या कलमाअन्वये तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. यामुळे हा गोळीबार नेमका कोणी केला, गोळीबारामागे कोणाचे कटकारस्थान होते? याबाबत तपासाअंती काय समोर येते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
परंतु कांबळे यांच्यावर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे सध्या मतदारसंघात मोठी खळबळ माजली आहे. एका पक्षाच्या उमेदवारावर अशा तऱ्हेने गोळीबार झाल्याने ही एक गंभीर घटना असल्याचे म्हटले जात असून या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होताना दिसतय.