राजकारण

…म्हणून ‘धनुष्यबाण’ हा आमचाच; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे.

धनुष्यबाण कोणाचा आहे? न्यायालयात काय निर्णय होईल? असे प्रश्न विचारले असता, गुलाबराव पाटील म्हणाले, “न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसे बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा? असे प्रश्न पडले असते. मात्र, शिवसेना पक्षानं नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे, असे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts