ऊस दराच्या बाबतीत नेहमीच जिल्ह्यात अग्रेसर राहिलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने २०२३-२४ च्या गळीतास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रीक टन पहिली उचल सरसकट २ हजार ८२५ रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी जाहीर केले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत २०२३-२४ च्या सुरु असलेल्या गळीत हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला द्यावयाच्या ऊस दराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी चालू वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ऊस क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.
मात्र यावर मात करून शेतकऱ्यांच्या ऊसाला यंदाही जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कधीही खंडीत होणार नाही. ऊस पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याच्या तुलनेत नेहमीच चांगला ऊस दर देण्यात सातत्य ठेवून हि परंपरा कर्मवीर शंकरराव काळे यांच्यापासून माजी आमदार अशोक काळे यांनी देखील सुरु ठेवली आहे.
हि परंपरा यापुढे देखील अबाधित ठेवायची आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र कमी असले तरी अशा परिस्थितीत कार्यक्षेत्रा बाहेरून ऊस आणून २०२३-२४ गळीत हंगामात गाळपाचे ठेवलेले उदिष्ट्य साध्य करून गळीत हंगाम यशस्वी करायचा आहे.
त्यासाठी मागील गळीत हंगामाप्रमाणे २०२३-२४ च्या गळीतास येणाऱ्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्वच ऊसाला प्र.मे.टन २ हजार ८२५ रुपये दर देण्याचा निर्णय उपस्थित संचालकांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.