राजकारण

विखे-थोरात संघर्षाचा नवा अंक ! सुजय विखे पाटील यांचा जयश्री थोरातांवर पलटवार, ”ताई ओ ताई, तालुक्याचा बाप कोण हे…..”

Sujay Vikhe And Jayashri Thorat News : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांचा राजकीय संघर्ष आता पुढच्या पिढीकडे वळता झालाय. विखे आणि थोरात यांच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक आता सुरू झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

थोरात यांच्या गावी जाऊन राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर नुकतीचं जोरदार टीका केली होती.

दरम्यान याच टीकेला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखे यांचा चांगलाचं समाचार घेतला होता. जयश्री थोरात यांनी, खबरदार ! माझ्या बापाविषयी बोलाल तर. संगमनेर तालुक्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही, असा दम भरला होता. यामुळे थोरात आणि विखे यांच्यातील राजकीय संघर्ष हा पुढच्या पिढीकडे आला असल्याचे दिसते.

दरम्यान आता जयश्री थोरात यांच्या विधानावर उत्तर देताना सुजय विखे पाटील यांनी जयश्री थोरात आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढवलाय. सुजय विखे पाटील यांनी संगमनेरात एका मेळाव्याला संबोधित करताना, “ताई.. ओ.. ताई… मी तुमच्या वडिलांबद्दल काहीच बोललो नाही.

मी आमदारांची कार्यपद्धत, निष्क्रियतेबद्दल बोललो आहे. 40 वर्षांपासून जो आमदार गोरगरीब जनतेच्या आयुष्याशी खेळ करत राहिला, त्याच्याबद्दल बोललोय. एखादा माणूस गोरगरीबांचं रक्त पित असेल, तर त्याविरुद्ध विखे-पाटील सदैव उभा राहिल,” असं म्हणतं थोरात कुटुंबावर हल्ला चढवला.

संगमनेरात परिवर्तन होणार

पुढे बोलताना विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची सत्ता आपण उलथून टाकू असे म्हटले आहे. ते म्हणालेत की, ‘लोकशाहीत तुम्ही आम्हाला बोलायचं थांबवू शकत नाही. ताई… ओ.. ताई.. जरा ऐकायला शिका. वर्षानुवर्षे तुम्ही लोकांची तोंड दाबून ठेवले. आज हा संगमनेर तालुका गप्प बसणार नाही.

तुम्ही कानात कापसाचे बोळे घातलेत तरी हा आवाज तुमच्या घरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. ही परिवर्तनाची नांदी आहे. संगमनेरमधील प्रस्थापितांचा तख्ता पलट केल्याशिवाय थांबणार नाही.’

तालुक्याचा बाप कोण 20 नोव्हेंबरला जनता दाखवणार

यावेळी सुजय विखे पाटील यांनी थोरात यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला असून तालुक्याचा बाप कोण हे 20 नोव्हेंबरला जनता दाखवून देणार असे म्हटले आहे. ते म्हणालेत, ‘जनता ही मायबाप असते. पण, इथल्या राजकन्या म्हणतात, येथील जनता नाही, तर आमदार बाप आहे. कदाचित तुम्ही गोरगरीब जनतेचा बाप काढायला निघाला आहात.

मात्र हे कदापी सहन होणार नाही. आता 20 नोव्हेंबरला संगमनेरची जनता तुम्हाला दाखवून देईल की, तालुक्याचा बाप जनता आहे की आमदार आहे.’ यावेळी सुजय विखे पाटील यांनी संगमनेर येथील प्रस्थापितांचा यावेळी पराभव होणार असे म्हणतं विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कन्या जयश्री थोरात यांना इशारा दिला आहे.

यामुळे सध्या सुजय विखे पाटील यांच्या या भाषणाची संपूर्ण मतदार संघात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. सुजय विखे पाटील यांनी या निमित्ताने आपण संगमनेरातून थोरात यांच्या विरोधात दंड थोपटणार असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. यामुळे यंदाची संगमनेरमधील विधानसभा निवडणूक फारच काटेदार होईल असे दिसते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts