Sujay Vikhe News : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण राहुरी किंवा संगमनेर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची घोषणा केली होती. आता मात्र त्यांनी फक्त आणि फक्त संगमनेर टार्गेट केले आहे. संगमनेर मधूनच निवडणूक लढवायची असा चंग सुजय विखेंनी बांधला आहे.
त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून नगरच्या राजकीय वर्तुळात या गोष्टीची विशेष चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच सुजय विखे पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गावात अर्थातच संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाला भेट दिली.
या गावात झालेल्या जाहीर सभेत सुजय विखे यांनी, तुम्ही त्यांना 35 वर्षे दिलीत, मला फक्त पाच वर्षे सत्ता देऊन पहा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधून उभे राहण्याचे जवळपास निश्चित केले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे किंवा महायुतीकडे या जागेवरून दुसरा कोणी ताकतवर चेहरा देखील नजरेस पडत नाही. यामुळे संगमनेर मतदार संघात सुजय विखे यांना संधी मिळू शकते असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दुसरीकडे सुजय विखे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे वडील आणि राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील मोठी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना सुजय विखें यांच्या वक्तव्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय राजकीय निर्णय घेण्यास पूर्णपणे सक्षम आहे. तसेच, त्याने जो काही निर्णय घेतला असेल त्या निर्णया समवेत आपण आहोत असे देखील स्पष्ट केले आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याच पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकंदरीत विखे पिता पुत्र यांनी संगमनेरसाठी यावेळी मोठी प्लॅनिंग केली असल्याचे समजत आहे.
यामुळेच की काय गेल्या काही महिन्यांपासून विक्या पिता पुत्रांचे पाय संगमनेरकडे अधिक वळत आहेत. गेल्या काही महिन्यांच्या काळात सुजय विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेकदा संगमनेरचे दौरे केले आहेत. यावरून यंदाच्या निवडणुकीत सुजय विखे पाटील विरुद्ध थोरात अशी निवडणूक पाहायला मिळू शकते असेच संकेत मिळत आहेत.