Sujay Vikhe Patil : नगरची लोकसभा निवडणूक ही एक हाय प्रोफाईल निवडणूक होती. महसूल मंत्री सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात ही काटेदार लढाई झाली. यात सुजय विखे पाटील यांचा दारुण पराभव झाला. निलेश लंके हे सुजय विखे पाटील यांचा पराभव करून जायंट किलर बनलेत. खरंतर लोकसभेचा निकाल कधीचं जाहीर झाला आहे. पण तरीही नगर दक्षिणची लोकसभा निवडणूक अजूनही चर्चेत आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील फुल विक्री संदर्भात उच्च न्यायालयात प्रविष्ट असणाऱ्या प्रकरणात आत्तापर्यंत ज्या-ज्या बाबींचे सबमिशन झाले, यात फुल विक्रीची पद्धत कशी राहणार, फुल विक्रेत्यांसाठी नियमावली कशी राहणार आणि यावर फुल उत्पादकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी आपल्या पराभवावरही भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी असे म्हटले की, फुल विक्री कशी करावी याबाबतची सविस्तर कार्यपद्धती यासंदर्भातील कलेक्टर आणि तीन सदस्य समितीचा एक अहवाल ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयात सादर झाला आहे.
आता माननीय उच्च न्यायालय या प्रकरणात सर्व बाबी जाणून घेईल आणि मग यावर निकाल येईल. या प्रकरणात काही फुल उत्पादक शेतकऱ्यांनी कोर्टात इंटरवेंशन म्हणून धाव घेतली होती. दरम्यान, काल या प्रकरणात माननीय न्यायालयाने फुल विक्रीची परवानगी दिल्यानंतर फुलांची विल्हेवाट संस्थानच्या माध्यमातून कशा पद्धतीने लावली जाणार याबाबतचा लेखी अभिप्राय मागवला आहे.
दरम्यान, यावेळी सुजय विखे पाटील यांनी फुल विक्रीला कोर्टाकडून परवानगी मिळणार असा विश्वास व्यक्त केला आहे. आजच्या या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, 10 – 20 फुल उत्पादक शेतकऱ्यांची एक कमिटी बनवली जाणार आहे, या कमिटीमध्ये सर्वपक्षीय शेतकरी, सर्व गावांच्या शेतकऱ्यांचा समावेश राहणार आहे.
या कमिटीच्या माध्यमातून विक्रीची प्रक्रिया कशी असावी जेणेकरून फुल उत्पादकांचेही नुकसान होणार नाही आणि भाविकांना देखील विनाकारण भुर्दंड सहन करावा लागणार नाही हे ठरवण्याचे काम केले जाणार आहे. तसेच माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने आणि शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने फुल उत्पादकांना एक स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या जागेवर काँक्रेट करून शेड तयार केले जाईल आणि येथूनच फुल विक्री करता येणार आहे. परंतु ही बाब अजून न्यायप्रविष्ट आहे. तथापि 12 जुलै पर्यंत निकाल लागेल आणि फुल विक्रीला परवानगी मिळेल असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला. तसेच निकाल लागण्याच्या आधी सर्व पूर्वतयारी करून ठेवू आणि त्यानंतर माननीय उच्च न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल असेही यावेळी विखे यांनी म्हटले आहे.
यावेळी सुजय विखे पाटील यांनी साईबाबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम राहिले आहेत, यामुळे नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभव होण्यामागे साई बाबांचा काहीतरी वाजवी उद्देश असावा असे म्हटले आहे. तसेच साईबाबांनी जो न्याय दिला आहे तो पॉझिटिव्हपणे स्वीकारून पुढे कामाला लागायचे आहे असेही म्हटले.