Sujay Vikhe Patil News : भारतीय निवडणूक आयोगाने नुकतेच विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. अर्थातच राज्यात आता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अशा परिस्थितीत, आता राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.
महा विकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही गटांमध्ये सध्या जागावाटपावर मंथन सुरू आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
मात्र, लवकरच महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. त्याआधीच मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारले आहे.
खरंतर सुजय विखे पाटील यांनी सुरुवातीला राहुरी किंवा संगमनेरमधुन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी राहुरी वगळून थेट संगमनेर मधूनच निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गावात जाऊन नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थोरात यांना आव्हान देत संगमनेर मधून निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते.
यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना येथून उमेदवारी देऊ शकते असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र भारतीय जनता पक्षाने एकाच कुटुंबात दोन जणांना उमेदवारी नको असे कारण पुढे करत सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नाकारली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दुसरीकडे, महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिंदे गटाकडे आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांना येथून तिकीट देता येणे अशक्य आहे. अशातच मात्र सुजय विखे पाटील यांचे पिताश्री आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
या दोघांमध्ये बंद दाराआड अंतरवाली सराटीत चर्चा झाली आहे. या भेटीत नेमके काय घडले आहे याबाबत अजून कोणताच अधिकृत तपशील समोर आलेला नाही. परंतु या निमित्ताने सुजय विखे पाटील हे अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी तर करत नाहीत ना अशा चर्चांनी जोर पकडला आहे.
दरम्यान, अपक्ष लढायचं असल्यास मराठा समाजाची मदत मिळणार का ? याचाचं अंदाज घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असल्याचा दावाही केला जाऊ लागला आहे. यामुळे सुजय विखे पाटील खरंच अपक्ष निवडणूक लढवणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.