Sujay Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काही अनपेक्षित निकाल सुद्धा पाहायला मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांचा सुद्धा पराभव झालाय.
सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी मात दिली. तेव्हापासून या दोन्ही उभय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. खरे तर सुजय विखे पाटील हे निवडणुकीत पडणार असे कोणालाच वाटत नव्हते.
नगर जिल्ह्याचे राजकीय विश्लेषक देखील सुजय विखे पाटील ही निवडणूक सहजतेने जिंकतील असा विश्वास व्यक्त करत होते. मात्र जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला.
निलेश लंके यांनी बाजी फिरवली आणि विजयी पताका फडकवली. सुजय विखे यांच्या पराभवावर अनेकांनी वेगवेगळी कारणे दिलीत. स्वतः सुजय विखे पाटील यांनी देखील आपल्या पराभवावर अनेकदा भाष्य केले आहे.
सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील हे जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत आहेत. दरम्यान सुजय विखे पाटील यांनी राहुरी मतदार संघात एका मेळाव्यात बोलताना आपल्या पराभवावर भाष्य करत खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केली अन त्यांना इशारा दिला आहे.
यावेळी डॉक्टर विखे यांनी ‘मी कुठेही गेलेलो नाही, लपलेलो नाही. टायगर अभी जिंदा है ! असं म्हणतं कुणीही काळजी करायचं कारण नाही. असे वादळ येत असतात आणि जात असतात. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांना देखील पराभव स्वीकारावा लागला.
मी तर त्यांच्या १० टक्केही नव्हतो. परिस्थिती बदलली, माझा पराभव झाला. पण परिस्थिती नेहमीच बदलत असते. मात्र, आपण पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच उमेदीने सर्वसामान्य जनतेचे काम करत राहणार’, असे वक्तव्य करतात निलेश लंके यांना इशारा दिला आहे.
….तर तुम्ही तुमच्या पिढीचा कार्यक्रम केलाय
यावेळी बोलतांना सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर टीका केली आहे. विखे पाटील म्हटलेत की, ‘तुम्ही निवडून दिलेल्या माणसाच्या भाषणांमध्ये हा बोगस आहे, याला गाडू, अशा प्रकारचं वक्तव्य ऐकायला मिळतं.
मग तुम्ही लोक कसे मतदान देता ? मी आज याठिकाणी आलो आहे. येथे जमलेल्या लोकांपैकी अर्ध्या लोकांनी माझा कार्यक्रम केलाय. मात्र, मी तुम्हाला सांगतो की, माझा कार्यक्रम झाला नाही तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा कार्यक्रम केलाय.’