Sujay Vikhe Patil : २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होईल आणि निळवंडेमधून राहुरी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडले जाईल. हे दोन्ही सण नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरे करावेत. मात्र हे सर्व काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील कनगर, गुहा, तांभेरे या ठिकाणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पंचक्रोशीतील नागरिकांना काल बुधवारी (दि.२७) साखर व हरभरा डाळ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, संदीप गिते, विजय कानडे, दिपक वाबळे, अमोल भनगडे, दादा हारदे, मयूर हारदे विजय बलमे, सरपंच सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाळासाहेब गाढे बाबासाहेब गाढे,
संदीप घाडगे, महमद इनामदार, दत्तू गाढे, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय गाढे, भगवान घाडगे, सुभाष नालकर, भाऊसाहेब घाडगे, राजेंद्र दिवे, शंकरराव जाधव, यशवंतराव जाधव, तुषार गाढे, दादासाहेब घाडगे, सुनील शेटे, गोविंदराव दिवे उपस्थित होते.
खा. डॉ. विखे म्हणाले की, शिंदे व फडणवीस सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीकोनातून तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक विकासकामे होत आहेत. दीड वर्षामध्ये जी विकासकामे केली गेली, ती विकासकामे तीन वर्षे सत्ता असून देखील विरोधी पक्षाने केली नाहीत.
येत्या २२ तारखेला निळवंडेच्या कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहुरी तालुक्यामध्ये पालकमंत्री पाणी सोडतील. तो अधिकार त्यांचा आहे. कनगरच्या वर्ग दोनच्या जमिनीचा प्रश्न देखील अगदी कमी कालावधीमध्ये मार्गी लावला जाईल. सत्तेचा वापर जनकल्याणासाठी करणारी विखे घराणे जे काम हातात घेते ते पूर्णत्वास नेते. त्याची कुणी काळजी करू नये.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की, खा.डॉ. सुजय विखे पाटील व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकासकामे केली जात आहेत. आम्ही नेहमी विकासासाठी अग्रेसर राहणारे आहोत. महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये जे नामदार झाले. त्यांचे काम शून्य असल्याने नागरिकांना आज देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावेळी सरपंच सर्जेराव घाडगे यांनी प्रास्ताविक केले.
साखर व हरभरा डाळ वाटणे ही शासनाची योजना नाही. येत्या २२ तारखेला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होत आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा मोठा सण आहे. या निमित्ताने साखर व डाळीच्या माध्यमातून प्रत्येक घराणे लाडू बनवून श्री रामांना वाहून त्यांची पूजा करावी. त्यांना हा नैवेद्य दाखवावा आणि हा आनंद उत्सव दिवाळी सारखा साजरा करावा. हा शुद्ध उद्देश घेऊन आम्ही सर्वत्र हा उपक्रम राबवत आहोत. – खासदार डॉ. सुजय विखे पाटील
निधी पालकमंत्री व खासदार आणतात आणि श्रेय घेण्यासाठी त्याचे भूमिपूजन विद्यमान आमदार करतात. मात्र येत्या निवडणुकीमध्ये जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल. ५० वर्ष रखडलेला निळवंडेचा प्रश्न २५ वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. येत्या काही दिवसांमध्ये कनगरच्या गावासंदर्भातील वनखात्याचा प्रश्न देखील पालकमंत्री मार्गी लावणार आहेत. – शिवाजी कर्डिले, अध्यक्ष – जिल्हा बँक