Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी लागला आहे. खरे तर थोरात विरुद्ध विखे हा संघर्ष संपूर्ण नगर जिल्ह्याला किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे.
लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांच्या पराभवासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते म्हणून हा राजकीय संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. याच साऱ्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी आता थेट बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातचं दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले.
सुरुवातीला सुजय विखे पाटील यांनी विधानसभेसाठी राहुरी आणि संगमनेर या दोन जागेचा पर्याय पक्षश्रेष्ठीपुढे ठेवला होता. या दोन्ही विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील यांचे सुर बदलले आहेत. त्यांनी आता थेट थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा मानस बोलून दाखवला आहे.
यासंदर्भात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सुजय निर्णय घेण्यात सक्षम असून त्यांच्या निर्णया मागे आम्ही ठामपणे उभे राहू असे सांगत सुजय विखे हे संगमनेर मधूनच निवडणूक लढवणार याला दुजोरा देण्याचे काम केले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील अशी निवडणूक रंगणार अशा चर्चा सुरू झाल्यात.
गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचे संगमनेर मधील दौरे सुद्धा वाढले आहेत. दरम्यान सुजय विखे पाटील यांनी आता बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावात जाऊन थोरात यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. थोरात यांच्या गावात जाऊन सुजय विखे पाटील यांनी त्यांना ओपन चॅलेंज दिले आहे. यावेळी विखे यांनी संगमनेरकरांनी त्यांना 35 वर्षे दिलीत पण माझ्यासारख्या युवकाला पाच वर्षे द्या अशी भावनिक साद घातली आहे.
म्हणून थोरात विरुद्ध विखे अशीच रंगतदार लढत यंदा संगमनेर मध्ये पाहायला मिळेल अशा चर्चांना बळ मिळाले आहे. जर या दोन नेत्यांमध्ये निवडणूक झाली तर नक्कीच याचा राज्याच्या राजकारणावर देखील मोठा परिणाम होणार आहे. थोरात यांचे जोर्वे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात येते. या गावात जाऊन सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्या विरोधात ललकारी दिली.
सुजय विखे काय म्हटले
‘या गावात खऱ्या अर्थाने 2009 पासून विकासाची प्रक्रिया सुरू झाली. मंत्री विखे पाटील यांनी उपलब्ध करून दिलेला निधी पाहाता, यापूर्वी या भागातून आमदार निवडून कसे गेले? असा प्रश्न पडतो. या गावाचा शिर्डी मतदार संघात समावेश झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी, येथील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा लागला.
कोविड काळात जेव्हा लोकांना औषधांची गरज होती, तेव्हा फक्त विखे परिवार उभा राहिला होता. गावात पूर आला, तेव्हा सुध्दा गावाकडे पाठ फिरवली होती. पण आता लोकांनी यांना पुरते ओळखलं आहे.’ पुढे बोलताना विखे पाटील यांनी ‘गेली अनेक वर्षे त्यांच्या कुटुबांच्या ताब्यात सर्व सत्तेचे केंद्र आहेत. तेच ठेकेदार आणि तेच पदाधिकारी अनेक वर्षे झाल्यापासून कार्यरत आहेत.
पण, राहाता तालुक्यात सर्व पद आम्ही सामान्य माणसाच्या ताब्यात दिलीत. पण, इथं तर सर्व सहकारी संस्था नातेवाईकाच्या ताब्यात आहेत. आमच्यावर दहशतीचा आरोप करता इथं, तर सामान्य माणसाच्या, आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.मग तुम्हीच सांगा दहशत कुणाची आहे? असा प्रश्न उपस्थित करत सुजय विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
जोर्वे पंचायतीमध्ये युवकांनी विकास प्रक्रियेच्या जोरावर परिवर्तन घडवून आणले आहे. आता तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांच्या सहकार्याने असेच परिवर्तन घडवून आणायचे आहे. यावेळी त्यांनी तुमच्या पाहुण्यांना इथे आणून विकास दाखवा, हळूहळू नातेवाईकांना फोन करा असे मनात संगमनेरातून निवडणूक लढवण्याचे त्यांनी मनावर घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे.