Ahmednagar Politics News : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना, मुळा सूतगिरणी कुणी बंद पाडली. राहुरी नगरपालिका हद्दीत विरोधकांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे हे काम कोण करतो.
कवडीमोल भावाने साखर कारखाने विकत घ्यायचे, असे अनेक कारनामे करण्यात कोण आघाडीवर आहे हे तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे.
त्यामुळे सध्या कोण चोरीच्या भोवऱ्यात आहे हे तालुक्याला नाही तर राज्याला माहिती झाले आहे, अशी टीका कारखान्याचे माजी संचालक अनिल आढाव यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली आहे.
मानोरी बंधारा जलपूजन वरून माजी खा. प्रसाद तनपुरे व माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या कलगीतुरा रंगला आहे. माजी उपसभापती रविंद्र आढाव व काही कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्यावर टीका केली होती.
यावर पत्रकारांशी बोलतांना अनिल आढाव यांनी सांगितले की, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यांनी राहुरी तालुक्यातील महिलांना पंढरपूर दर्शन घडवून आणले.
तालुक्यातील लाखो महिला देवदर्शन करून आल्या. मात्र तनपुरेशी निगडित व्यक्तीने या यात्रेचा दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर असा उल्लेख करून सर्व महिला वर्गाचा अपमान केला आहे.
जो आम्ही कदापी सहन करणार नाही. मागील निवडणुकीत विखे – कर्डिले यांच्या अंतर्गत किरकोळ वादाचा फायदा घेत तनपुरे यांनी आमदारकी मिळविली. आता तशी कोणतीही सुतराम शक्यता सुध्दा राहिली नाही. दोन्ही नेते एकविचाराने विकास कामे करत आहेत. त्यामुळे तनपुरे व त्यांचे कार्यकर्ते हतबल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी मागणी केली त्या-त्या वेळी कर्डिले यांनी बंधारे भरून दिले आहेत. तनपुरे यांनी कधी तरी बंधारा भरून दिला आहे का? सध्या इडीच्या माध्यमातून कोणी काय चोरले हे तालुक्याला नाही तर राज्यातील जनतेला माहिती झाले असून अभ्यासू, व उच्चशिक्षित लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबाचे काम जनतेला कळून चुकले आहे, असेही आढाव यांनी म्हटले.
यावेळी मुळा नदी समस्या निवारण समितीचे अध्यक्ष उत्तमराव म्हसे, माजी संचालक व भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रविंद्र म्हसे, गोरक्षनाथ तारडे, उत्तमराव आढाव, शरदराव पेरणे, शिवाजी थोरात, काशीनाथ खुळे, सुदाम शेळके, पांडुरंग म्हसे, सुरेश भिमराज म्हसे, रामराव पेरणे, संदीप आढाव, श्रीकृष्ण भोसले आदी उपस्थित होते.