मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ अशी घोषणा शरद पवारांनी केली आहे. आमदार फुटले असले तरी शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबतच आहेत, असेही शरद पवार म्हणाले आहेत.
दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत. अनेक जण बोलले की, ४० मधील १-२ अपवाद सोडले तर एकही जण निवडून येणार नाही. सामान्या माणसाला ही गोष्ट आवडलेली नाही. शिवसेनेचे आमदार जरी गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.