Nilwande Dam : तळेगाव दिघे निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली. या दुष्काळी भागासाठीच आपण धरण व कालवे पूर्ण केले. वेळोवेळी आंदोलने झाली. धरण व कालवे पूर्ण होणे हा टप्पा आता पूर्ण झाला आहे.
आता लवकरच वितरिका पूर्ण करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देण्यासाठी काम होत आहे. वडीलधाऱ्यांच्या डोळ्यादेखत पाणी आल्याने त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.
पाणी म्हणजे जीवन आहे. निळवंडेच्या पाण्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था बदलत असून या नागरिकांच्या जीवनात समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी फाटा येथे निळवंडे कालवातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पाहणी करीत आमदार थोरात यांनी जलपूजन केले. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरण व कालव्यांची निर्मिती आपण दुष्काळी १८२ गावांसाठी केलेली आहे. याकामी अनेकांचे योगदान लाभले असून डाव्या कालव्याद्वारे दुष्काळी भागातील शेतकन्यांच्या शेतात आलेले पाणी हा आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे.
दुष्काळी भागातील जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे. दुष्काळी भागात निळवंडे धरणाचे आलेले पाणी आपल्या जीवनातील सुवर्णक्षण आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेल्या पाण्यामुळे तळेगाव भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी लहान मुले पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहे.
तर दिवाळीमुळे अनेक महिला भगिनी या पाण्यामुळे आनंदी आहेत. वर्षानुवर्ष पाण्याची वाट पाहणारे वडीलधारी मंडळीही डोळे भरून पाणी पाहत असून हे पाणी देणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेले अथक प्रयत्न व केलेला पाठपुरावा यामुळेच पाणी मिळाल्याची भावना ज्येष्ठ नागरिक श्रीराम मुंगसे यांनी व्यक्त केली.
इंजि. सुभाष सांगळे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनीच निधी मिळवून कालवे पूर्ण केले. उद्घाटन कोणी केले याला महत्व नसून काम कोणी केले हे महत्त्वाचे आहे.
निळवंडेचे काम आमदार थोरात यांनी केले आहे. हे सर्व जनतेला माहित आहे. तळेगाव भागात पाणी आल्याने आमदार थोरात यांनी आपला शब्द खरा केला असून त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.
मदत करणाऱ्या प्रति कृतज्ञता
निळवंडे धरण कामांमध्ये वेळोवेळी मदत करणारे तत्कालीन मुख्यमंत्री, पुनर्वसित झालेले सर्व धरणग्रस्त, याकामी मदत करणारे अधिकारी, कामगार, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, अकोले तालुक्यातील शेतकरी, ज्यांनी ज्यांनी योगदान दिले. त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे आमदार थोरात म्हणाले.