Maharashtra News : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक एकमेकांचे प्रचार करताना दिसत आहेत. वरच्या राजकारणाचा अहमदनरमधील राजकारणावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळत आहे.
दरम्यान कालपासून आणखी एकघटना अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात अग्रस्थानी राहिली आहे. ती म्हणजे आ. शंकरराव गडाख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीगाठी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार आमदार म्हणून ओळख असणारे गडाख काल (दि.२३) अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर गेलेले पाहायला मिळाले.
त्यामुळे ‘कैसे छोड दू अकेला तुम्हे, जिसको हराने के लिए सारी दुनिया चल पडी है’ हा आमदार शंकरराव गडाख यांचा शेर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड झाला. त्यामुळे आता यांच्या भेटीमुळे नगर जिल्ह्यात काही वेगळी समीकरणे तयार होतील का अशा चर्चाना उधाण आले.
आ. गडाख का गेले अजित दादांच्या देवगिरी बंगल्यावर
या भेटीनंतर विविध चर्चा सुरु झाल्यानंतर आ. शंकरराव गडाख यांनी माध्यमांशी संवाद साधताना या भेटीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मी अजित पवारांना दुसऱ्यांदा भेटायला आलो असून त्यांनी मला दिलीप वळसे पाटलांना भेटायला सांगितले होते व वळसे पाटील देवगिरी बंगल्यावर होते अशी माहिती समजल्याने मी तेथे आलो असे ते म्हणाले. तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की, मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्याबाबत ही भेट असून विकासकामांवरच चर्चा झाली आहे यांमध्ये राजकीय चर्चा झाली नाही. लोकांचे काम करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असून त्याकरता मी अजितदादांना, देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतो त्यामुळे या भेटीचा गैर अर्थ कुणीही काढू नये असं आ. गडाख यांनी म्हटले आहे.
लोकसभेचा विषयच येत नाही
आमच्या भेटीत काही राजकीय चर्चा झाली नसल्याचे आ. गडाख यांनी म्हटले असून आमचा मतदारसंघ नेवासा हा शिर्डी मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ राखीव असल्याने तिथे उभं राहण्याचा काही प्रश्न उद्भवतच नसल्याचे आ. शंकरराव गडाख यांनी स्पष्टोक्ती दिली आहे.