Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण हे महाराष्ट्रात नेहमीच अग्रस्थानी राहिले. याचे कारण असे की येथील राजकारण हे सहकाराभोवती, सगे सोयऱ्यांभोवती फिरत राहिले. तसेच येथील राजकीय विरोधक देखील एकमेकांचे कट्टर विरोधक होते.
पक्षनिष्ठता होती. असे असले तरी राजकारणात सुसंस्कृतपणा होता. परंतु आता काळाच्या ओघात अनेक गणिते बदलली आहेत. दरम्यान आता लोकसभेच्या अनुशंघाने विविध राजकीय घडामोडी घडत आहेत.
शिर्डी मतदार संघात महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार आहेत. आता त्यांच्यासोबत त्यांचे राजकीय विरोधक काँग्रेसचे आमदार लहू कानडे हे देखील प्रचारात सक्रिय झाले आहेत.
कानडे-वाकचौरे एकत्र !
लोकसभेसाठी शिर्डीतून उमेदवारीच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी आता महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना त्यांनी प्रथमच एका मंचावर आणले.
दोघांचे राजकीय मतभेद आहेत. दोघेही एकमेकाचे राजकीय स्पर्धक आहेत. दोघांनी २०१४ ची श्रीरामपूर विधानसभा एकमेकाविरुद्ध लढवली आहे. यावेळी कानडे हे देखील काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छूक होते. मात्र वाकचौरे यांनी हा मतदारसंघ ठाकरे गटाला कायम ठेवत उमेदवारीत बाजी मारली.
वाकचौरे यांच्या प्रचारार्थ कानडे यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा
वाकचौरे यांच्या प्रचारार्थ यशोधन संपर्क कार्यालयात कानडे यांनी सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यास उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, तालुकाप्रमुख लखन भगत, डॉ. महेश क्षीरसागर, अशोक थोरे,
सचिन बडधे, निखिल पवार, अरुण पाटील, काँग्रेसचे अरुण नाईक आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आपण काँग्रेस पक्षाचे शिलेदार आहोत.
श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. काँग्रेस पक्षाने ज्या बूथ समित्या केल्या आहेत, त्यात उद्धव सेनेच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्याचे कानडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
कानडेंवर असणार प्रचाराची धुरा
श्रीरामपूरमधील प्रचाराची धुरा ही कानडेंवर असणार आहे. महाआघाडीच्या प्रचाराचे श्रीरामपुरातील नेतृत्व कानडे यांनीच करावे. दिवसा एक व रात्री वेगळे हे त्यांचे धोरण नाही.
कानडे यांचे मोबाइल लोकेशन हे कायमच महाआघाडी असल्याचे माजी सभापती सचिन गुजर यांनी सांगितले. तसेच स्वतः कानडे यांनी लोकसभेच्या निमित्ताने वाकचौरे यांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे तर आपली ही चाचणी परीक्षा आहे असे वक्तव्य केले.