मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर आता उद्धव ठाकरेंनी भर सभेत शिवसैनिकांना दोन महत्त्वाच्या गोष्टी मागितल्या आहेत.
सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण आता त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. या कारस्थानाला नुसत्या जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र द्यावे लागेल. मला प्रत्येकाचे शपथपत्र हवे आहे. मी पक्षप्रमुख आहे. माझ्यासह गटप्रमुख ते सर्व पदाधिकाऱ्यांचे मला शपथपत्रे हवी आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त सदस्यनोंदणी झाली पाहिजे. मला सदस्यनोंदणीच्या अर्जाचे गठ्ठेच्या गठ्ठे हवे आहेत. काही दिवसानंतर माझा वाढदिवस आहे. मला पुष्पगुच्छ नको आहेत. मला सदस्यांच्या अर्जाचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले आहे.
बिकाऊ असणारे सगळे गेले आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीज कामाला लावल्या आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. ही साधी माणसं माझे वैभव आहे. तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी हे वैभव त्याला पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.