Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी याबाबत काल स्पष्ट वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचा चेहरा उत्तम आहे. अनेक विरोधी पक्षांना वाटतं की त्यांनी विरोधी पक्षांचे नेतृत्व करावे, असे राऊत यांनी म्हटले होते.
देशात नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांचेच नेतृत्व प्रभावी असल्याचे वक्तव्यही राऊत यांनी याआधी केले आहे. असे असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता संदीप देशपांडे यांनी हे ट्विट केल आहे.
ते म्हणाले, देशाच्या भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर मला माफ करा, पण बुरा ना मानो होली है, आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची, असे ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, देशात नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारे एकमेव नेते म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यावरून संदीप देशपांडे यांनी असे खोचक ट्विट केले आहे. यामुळे सध्या याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. मॉर्निंग वॉकच्या वेळी काही गुंडांनी त्यांच्यावर स्टंप आणि रॉडने हल्ला केला. यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला इजा झाली. या हल्ल्यामागे ठाकरे गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे आता टीका टिप्पणी सुरू आहे.