Vidhansabha Nivdanuk : अजून लोकसभा निवडणुकीची झिंगही उतरली नव्हती तेवढ्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडण्याआधीच विधानसभेचा गुलाल वर उधळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसली आहे. निवडणूक आयोग नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेणार आहे.
26 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल आणि त्या आधीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
इच्छुक उमेदवारांची रंगीत तालीम सुद्धा सुरू झाली आहे. तथापि अजून दोन्ही गटांकडून म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटप फायनल करण्यात आलेले नाही. अशातच महायुतीच्या गोट्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या दोन्ही गटांमध्ये जागावाटपावर जोरदार खलबत सुरू आहे.
बंददाराआड होणाऱ्या बैठकांचा सपाटा गेल्या काही दिवसात वाढला आहे. अशातच मुख्यमंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच राजधानी मुंबईमधील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे.
शनिवारी मध्यरात्री ही बैठक संपन्न झाली असून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत या बैठकीत जागावाटपावर खलबत्त झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही बैठक जवळपास दोन तास सुरू होती आणि या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याचे समजते.
तसेच या बैठकीत महायुतीचा जाहीरनामा कसा असावा? या संदर्भात सखोल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. याशिवाय महायुतीची विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती कशी असायला हवी जेणेकरून महायुतीला भरगोस यश मिळेल याबाबतही कालच्या या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच काही केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील वरिष्ठ नेते अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत जागावाटप फायनल केल्याचे समजते.
अमित शहा यांच्या या बैठकीनंतर भारतीय जनता पक्ष 150 ते 160, शिंदे गट 80 ते 90 आणि अजितदादा गट 45 ते 50 जागांवर निवडणूक लढवू शकते, अशा स्वरूपाचा फॉर्मुला समोर आला होता. पण, शिंदे गट आणि अजितदादा गट या जागांवर समाधानी राहणार का ? याच फॉर्म्युल्यानुसार महायुती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की महायुतीची चाके रुळावरून निखळणार या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.
तथापि सूत्रांनी महायुतीचे जागावाटप हे जवळपास अंतिम झाले असून कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्ष 150 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. पण, यावर अजित पवार गट आणि शिंदे गट काय भूमिका घेतात आणि प्रत्यक्षात महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळतात याबाबत योग्य ती माहिती येत्या काही दिवसांनी समोर येईल अन त्यावरच महायुतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.