Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकीकडे. विधानसभेच्या निवडणुका कधी होणार हाच मोठा यक्षप्रश्न आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील विविध राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
विविध राजकीय पक्षातील इच्छुक नेत्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या माध्यमातून अजून जागा वाटप झालेले नाही मात्र येत्या काही दिवसात जागावाटप पूर्ण होणार असून महाविकास आघाडीच्या जागावाटप एक ऑक्टोबरला होण्याची दाट शक्यता आहे.
महाविकास आघाडी मधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू अशी घोषणा केली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये देखील जागावाटप संदर्भात चर्चासत्र सुरू आहे. जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व नुकतेच महाराष्ट्रात दाखल झाले होते.
गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करून जागा वाटपाचा फॉर्मुला फायनल केल्या असल्याच्या चर्चा आहेत. यावरून येत्या काही दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांकडून उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते असे दिसत आहे. अशातच, आता राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय निवडणूक आयोगाचे 14 सदस्यांचे एक पथक गुरुवारी राज्यात दाखल झाले आहे. हा निवडणूक आयोगाचा 14 जणांचा चमु आज आणि उद्या राज्यातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे. यानंतर मग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
कधी होणार निवडणूक?
सध्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु असून महाराष्ट्रात 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान विधानसभेच्या निवडणूका होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. एवढेच नाही तर राज्यातील निवडणुकांचा निकाल 20 नोव्हेंबरला लागणार असाही दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. शनिवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की त्याच दिवसापासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात हा मोठा यक्षप्रश्न आहे.
राजकीय विश्लेषकांनी यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होऊ शकते असा अंदाज दिला आहे. परंतु मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होऊ शकतात असे म्हटले होते. जर समजा राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्यात तर 13 आणि 16 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया होईल आणि 20 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागेल.
पण जर एका टप्प्यात निवडणूक झाली तर 16 नोव्हेंबरला निवडणूक होईल आणि 20 तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल. तथापि या फक्त चर्चा आहेत या संदर्भात अजून निवडणूक आयोगाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जेव्हा निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल तेव्हाच निवडणूक एका टप्प्यात होणार की दोन टप्प्यात आणि निवडणुकीची तारीख काय राहणार या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहेत.