Ahmednagar Loksabha : अजून अवकाश आहे तरीही लोकसभेसाठी अहमदनगर च्या जागेवरून विखे-लंके यांत चांगलाच वाद पेटलाय. अहमदनगर लोकसभेसाठी सध्या खा. सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत. तर आ. निलेश लंके हे अहमदनगर लोकसभेसाठी उत्सुक आहेत.
या दोघांची लढत होणार हे साधारण दोन वर्षांपासून चर्चिले जात आहे. शरद पवार यांनी देखील त्यांना बळ दिले होते. परंतु जेव्हा निलेश लंके हे अजित पवार गटासोबत भाजपसोबत सत्तेत गेले तेव्हा ही शक्यता धूसर झाली.
परंतु निलेश लंके हे विखेंच्या विरोधात भूमिका घेत राहिले व लोकसभेसाठी तयारी सुरूच ठेवली. आता मात्र त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी काही झाले तरी लोकसभा लढवणारच अशी घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले.
मंत्री राधाकृष्ण विखे यांची टीका
लंके यांच्या या भूमिकेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लंके यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले स्वयंघोषित उमेदवारांना कोण रोखणार? असा सवाल केला. यावर आमदार नीलेश लंके यांनी ‘स्वयंघोषित’चा मुद्दा हा त्यांच्यासाठी छोटा आहे. असे सांगून लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
विखेंना प्रतिउत्तर
मंत्री विखे यांच्या या टीकेला उत्तर देताना आमदार नीलेश लंके म्हणाले, त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊ नये त्यांच्या दृष्टीने हा विषय छोटा आहे. मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यावरच लोकशाही चालू आहे. पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणे, हे आमचे काम आहे. उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची ते त्यांनी ठरवायचे आहे, असे आ. लंके म्हणाले.
पक्षश्रेष्ठीच निर्णय घेणार
पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणे, हे आमचे काम आहे. उमेदवारी द्यायची किंवा नाही द्यायची ते त्यांनी ठरवायचे आहे, असे आ. लंके म्हणाले याचाच अर्थ हा निर्णय अंतिम पक्षश्रेष्ठींकडेच असणार आहे. यामध्ये भाजप की अजित पवार गट भारी भरतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.