Ahmednagar Politics : मागील अडीच वर्षात निळवंडे कालव्यांची कामे जाणीवपुर्वक कुणी रखडविली होती. या कालव्यांच्या कामाचा ठेका कोणाकडे होता है जनता जाणून आहे,
अशी टीका महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.
तालुक्यातील निळवंडे येथे विकसित भारत संकल्प यात्रा आणि निळवंडे पाण्याचे पुजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत वारकरी नामदेव पवार यांच्या हस्ते काल सोमवारी (दि.१७) करण्यात आले.
त्यावेळी केवळ अडवणूक करण्याच्या कारणाने ‘निर्मिती’ कंपनीचा ठेकेदार संपूर्ण विभागालाच वेठीस धरीत होता.
मात्र सरकार बदलल्या नंतर ही कामे सुरु झाली. कालव्यांची कामे रोखून कोणती ‘निर्मिती’ साध्य करायची होती, हे देखील निळवंडेचे श्रेय घेणाऱ्यांनी सांगावे, असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
याप्रसंगी सरपंच शशिकला पवार, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, भाजपाचे तालुका अध्यक्ष वैभव लांडगे, श्रीराम गणपुले, अमोल खताळ, जावेद जहागीरदार, हरिषचंद्र चकोर, शरद गोर्डे, वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात,
भाऊसाहेब आहेर, शिवाजी आहेर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धिरज मांजरे, गटविकास आधिकारी अनिल नागणे यांच्यासह विविध विभागाचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
यानिमित्ताने विविध योजनांच्या लाभाथ्यांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मंजुर झालेल्या लाभाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे.
त्यामुळेच तीन राज्यातील निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे खुप मोठे आहे. मोदीजींच्या नेतृत्वावर आणि पक्षावर जनतेने दाखविलेला विश्वास अधिक सार्थ ठरवायचा असेल तर, कार्यकत्यांनी लोकांमध्ये जावून योजनांसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
वर्षानुवर्षे ज्या पाण्याची प्रतिक्षा आपल्याला होती. त्या निळवंडे धरणाच्या कामासाठी महायुतीचे सरकार सत्तेवर यावे लागले. यापुर्वी सुध्दा युती सरकार असतानाच पहिल्- या २२ कि.मी अंतरावरील कामाला सुरुवात झाली. लाभक्षेत्रात आज पाणी पोहोचले आहे. याचा सर्वांना आनंद होत आहे.
यासर्व कामांचे श्रेय कोणाला घ्यायचे ते घेवू द्या, कोणाला जलनायक, खलनायक व्हायचे ते होवू द्या, त्याचे आपल्याला काही देणेघेणे नाही. निळवंडे धरणाच्या कामाबाबत झालेले राजकारण आता पाण्यात वाहून गेले आहे.
या भागात आता पाणी आले, पुढचे उदिष्ठ आपले रोजगार निर्मितीचे आहे. या भागामध्ये कृषिपुरक व्यवसाय, महिलांसाठी व्यवसायाच्या संधी आता याभागात निर्माण करायच् या आहेत. स्टार्टअप उद्योगासाठी केंद्र आणि राज्य सरकार मदत करीत आहे.
युवकांसाठी याबाबतचे प्रशिक्षण तसेच सरपंचांना सुध्या विकासाच्या आणि योजनांच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन होण्याकरीता कार्यशाळा आयोजित केली जाणार असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
सामान्य जनताच दहशत मोडून काढेल
राज्यात ट्रिपल इंजीन सरकार आहे. निधीची कमतरता भासणार नाही, कोणी कितीही अडथळे निर्माण केले तरी, या तालुक्याची विकास प्रक्रीया आता थांबणार नाही. हा तालुका केवळ ठेकेदारांच्या दावणीला बांधला गेला आहे.
ठेकेदारांच्या टोळ्यांनी निर्माण केलेली दहशत सामान्य जनताच आता मोडून काढेल, असा सुचक इशारा मंत्री विखे पाटील यांनी दिला. ठेकेदारांच्या टोळ्यांची दहशत आता सामान्य माणसं संपवतील.
या भागात निळवंडे धरणाचे पाणी आले, आता रोजगार उपलब्ध करुन देण्याचे उदिष्ट आपले असून, कोणाला खलनायक, जलनायक व्हायचे त्यांनी जरुर व्हावे, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.