Vivek Kolhe Vs Vikhe : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही, हे विशेष. यामुळे महाराष्ट्रातून भाजपाकडून कोण-कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर भाजपाने पहिल्या यादीत 195 उमेदवार जाहीर केले आहेत.
मात्र या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना डावलले गेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून असेच धक्कातंत्र राबवले जाणार अशा चर्चा सुरू आहेत. नगर जिल्ह्यातील भाजपाच्या वाटेला असलेल्या नगर दक्षिण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांना देखील आगामी लोकसभेत धक्का बसू शकतो, त्यांचा देखील नगर दक्षिणच्या जागेवरून पत्ता कट होणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
यामुळे विखे पिता-पुत्रांची देखील काळजाची धडधड वाढलेली असावी. अशातच मात्र विखे यांच्यावर स्वपक्षातूनच टीका होऊ लागली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्याच स्वपक्षातील युवा नेते, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी घरचा आहेर दिला आहे.
खरे तर नुकताच विवेक कोल्हे यांनी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून राहाता आणि कोपरगाव तालुक्यांतील ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी वाटपात राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार काळे हे दुजाभाव करत असल्याचा आरोप केला होता.
यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देताना मी अशा मोर्चा कडे लक्ष देत नाही असे म्हटले होते. अशातच आता विखे पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा विवेक कोल्हे यांनी घनाघाती टीका केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नगर शहरात शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आयोजित केले आहे.
हे महानाट्य निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. या महानाट्याला महायुतीमधून तसेच महाविकास आघाडी मधून देखील अनेक नेत्यांनी हजेरी लावलेली आहे. दरम्यान याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विवेक कोल्हे यांनी महानाट्याच्या व्यासपीठावरून विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ते म्हटले की, “नीलेश लंके यांनी अनेकांचे राजकीय नाट्य थोपवले आहे. नगर दक्षिणेत त्यांच्या माध्यमातून सुराज्य घडो. त्यांच्याकडून देशाबरोबर नगर दक्षिणची सेवा घडावी. नीलेश लंके हे डॉक्टर नीलेश लंके झालेले आहेत. ते माणसांचे डॉक्टर नसले, तरी ते चांगले-चांगले राजकीय आजार बरे करू शकतात.
नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर हे नीलेश लंकेच दूर करू शकतात”. एकंदरीत लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच आणि महाराष्ट्रात जागा वाटपावर मंथन सुरू असतानाच स्वपक्षातील नेत्यांनीच घरचा आहेर दिला असल्याने विखे यांचे टेन्शन वाढणार आहे.
दुसरीकडे महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या निलेश लंके यांच्या माध्यमातून नगर शहरात आयोजित झालेल्या महानाट्याला लोकांनी भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. या महानाट्याला महायुतीमधून तसेच महाविकास आघाडीमधून देखील अनेक नेत्यांनी हजेरी लावलेली आहे. यामुळे ही घडामोड देखील विखे पिता-पुत्र यांचे टेन्शन वाढवणार आहे.
याबाबत नगर दक्षिणची उमेदवारी देताना नक्कीच विचार होऊ शकतो. यामुळे आता निलेश लंके यांचे हे महानाट्य आणि स्वपक्षातून आमदार राम शिंदे तसेच विवेक कोल्हे यांनी विखे यांच्या विरोधात खोललेला मोर्चा यामुळे डॉक्टर सुजय विखे यांच्या तिकिटावर गदा येते का ? हे आता विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.