Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. परिणामी राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आगामी लोकसभेत आणि विधानसभेत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार संघात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून नेतेमंडळी पक्षश्रेष्ठींवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. महायुतीत देखील असंच वातावरण आहे आणि इंडिया आघाडीत देखील असंच काहीसं वातावरण पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे हे दबाव तंत्र आगामी काही दिवसात आणखी वाढणार आहेत. नवीन वर्षाची सुरुवात झालेली असली तरी देखील निवडणुका नंतरच काही लोकांचे नवीन वर्ष सुरू होणार आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांनी या नवीन वर्षात काय संकल्प घेतला आहे,
2024 हे निवडणुकांचे वर्ष राहणार आहेत यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून जिल्ह्यातील आमदारांनी नेमका काय संकल्प घेतला आहे याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राधाकृष्ण विखे पाटील : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये महसूल मंत्री म्हणून कार्यरत राधाकृष्ण विखे पाटील यांनी या नवीन वर्षात मतदारसंघातील आणि जिल्ह्याच्या विकास करण्याचा संकल्प घेतला आहे.
औद्योगिक विकासाला गती देण्याचा आणि अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांना स्व जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. नगर आणि शिर्डी या ठिकाणी एमआयडीसीसाठी जागा उपलब्ध होईल आणि यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळणार अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर अधिक भर राहणार असे देखील त्यांनी सांगितले आहे.
रोहित पवार : पवार कुटुंबातील सदस्य, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील आमदार रोहित पवार यांनी या नवीन वर्षात सर्वसामान्यांचा विकास करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यांनी या नवीन वर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर जोमाने काम करण्याची तयारी दाखवली आहे. मतदार संघासाठी आणि कुटुंबासाठी जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याचा त्यांनी संकल्प घेतला आहे. शिवाय व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आरोग्यावर देखील लक्ष केंद्रित करणार असा संकल्प त्यांनी या नवीन वर्षासाठी घेतला आहे.
बबनराव पाचपुते : श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार बबनराव पाचपुते यांनी मतदारसंघातील नागरिकांचा एकात्मिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प घेतला आहे. केंद्र आणि राज्य कडून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला निधी जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च करण्याचा संकल्प त्यांनी या नवीन वर्षात घेतला आहे. एवढेच नाही तर आगामी लोकसभेत भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी देखील प्रयत्न करणार असे त्यांनी म्हटले आहे.
मोनिका रांजळे : शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका रांजळे यांनी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून मतदारसंघातील विकास कामे करण्याचा संकल्प घेतला आहे. मतदारसंघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी या नवीन वर्षात युद्ध पातळीवर प्रयत्न करणार असा निर्धार त्यांनी घेतला असून संघटना आणि पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
आशुतोष काळे : कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांनी या नवीन वर्षात त्यांच्या मतदारसंघात कोणतेच प्रश्न किंवा समस्या नाही त्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प घेतला आहे. मतदारसंघालाच आपण आपले कुटुंब मानतो यासाठी याच्या विकासासाठी कायमच झगडत राहणार असे त्यांनी म्हटले आहे. मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे त्यांनी या वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी बोलून दाखवला आहे.
संग्राम जगताप : अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी मतदारसंघातील काही प्रलंबित रस्ते मार्गांची कामे या चालू वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे. याशिवाय इतरही अन्य प्रलंबित विकास कामांना यंदाच्या वर्षी पूर्ण करू, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.