राजकारण

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले.

‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची आपली तयारी असायला हवी. आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्यात तसेच जिथे आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता जागा लढवावी’, असे अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १५ वर्षे काँग्रेससोबत संसार केला. मात्र त्यातही काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवण्याची भूमिकाही घेतली. यातून केवळ समोरील विरोधकांचा पराभव झाला पाहिजे ही भूमिका होती. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यांची भूमिका लवकरच मांडण्यात येईल. पण भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याची जिथे गरज असेल तिथे तशी भूमिका घ्यायची, असेही अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, अधिवेशन काळात पक्षाच्यावतीने विधानसभेत आक्रमक भूमिका मांडण्याचे काम निश्चितपणे होईल. जिथे सत्ताधारी चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू आणि जिथे योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts