Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन मतदार संघ असून महाविकास आघाडीमध्ये अहमदनगर या मतदार संघाची जागा शरद पवार गटाला मिळाली असल्याचे सांगण्यात येते.
शिर्डी या मतदार संघासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना ताकद लावत असतानाच आता येथे काँग्रेसने दावा सांगितल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून १८ लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले आहेत.
मात्र त्यामध्ये शिडींचा अद्याप समावेश झालेला नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे. शिर्डीसाठी काँग्रेस आग्रही असल्याचे जाहीर केल्याने संभाव्य उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरु झालेली असतानाच आता श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे.
उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ मौन चर्चेचा विषय
लोकसभा निवडणूक जवळ आल्याने शिवसेनेची भक्कम दावेदारी असणाऱ्या मतदारसंघांमध्ये समन्वयक नेमण्यात आले आहेत. शिर्डीवरून मात्र अद्यापही महाविकासआघाडीमध्ये एकमत होऊ शकलेले नाही.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिर्डी मतदारसंघ पिंजून काढला होता. तरीही उमेदवाराबाबत त्यांनी संकेत शिवसैनिकांना दिले नव्हते. दौऱ्यात काही इच्छुक मंचावर उपस्थित असताना उमेदवारीवरून ठाकरे यांनी पाळलेले मौन चर्चेचा विषय ठरले आहे.
आ. थोरात काय म्हणाले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे शनिवारी एका कार्यक्रमात शिर्डीवर दावा केला आहे. २७ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होत असून त्यात यावर चर्चा होईल, असे थोरात यावेळी म्हणाले.
सध्याचा शिर्डी व तत्पूर्वी कोपरगाव लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत नेते बाळासाहेब विखे यांच्या रूपाने काँग्रेसने येथे दीर्घकाळ वर्चस्व गाजवले आहे असे ते म्हणाले.
आ. लहू कानडे खासदारकीचे संभाव्य उमेदवार ?
काँग्रेसने जागावाटपात शिडींबाबत आग्रही मागणी केल्यास आमदार लहू कानडे संभाव्य उमेदवार राहू शकतात.
कानडे हे थोरात समर्थक आहेत ही त्यांची जमेची बाजू ठरते. काँग्रेस पक्ष व थोरात यांनी कानडे यांना यापूर्वी उमेदवारीबाबत विचारणा केल्याची माहिती समजली आहे.