निळवंडे कालव्यांच्या कामावर यापुर्वी फक्त भाषणबाजी करण्यात काहींनी धन्यता मानली. मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पाणी मिळवून देण्याचा दिलेला शब्द आज पुर्णत्वास जात आहे. शेवटच्या गावाला पाणी मिळवून देण्यासाठी कालव्यांची आणि वितरीकांची कामे सुरु झाली असून, या कामांना निधीही कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील वडझरी शिवारात निळवंडे प्रकल्पाच्या तळेगाव शाखा कालव्यावरील वितरिका क्र. ३ च्या कामाचे भूमीपुजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी आ.आशुतोष काळे, सरपंच पुजा झींझुर्डे, राधिका आंबेडकर, सौ.पुनम डांगे, सौ.सोनम शेख यांच्यासह नानासाहेब डांगे, उत्तमराव डांगे, सचिन कानकाटे, शरद गोर्ड, वैभव डांगे, तहसिलदार धिरज मांजरे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदिप हापसे, गटविकास आधिकारी नागणे आदि यांप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे कालव्यांच्या वितरीकेमुळे कोपरगाव तालुक्यातील १०, राहाता तालुक्यातील ६ आणि संगमनेर तालुक्यातील १ अशा १७ गावातील शेतक-यांना फायदा होणार असून, शेवटच्या गावाला पाणी मिळावे हाच आपला प्रयत्न आहे. यापुर्वी फक्त पाणी देण्याची भाषणं झाली. मात्र राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ख-याअर्थाने कालव्यांच्या कामाला गती मिळाली. धरणाचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते आपण केले. युती सरकारने निधी उपलब्ध करुन दिल्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
यावर्षी पावसामुळे सर्व धरणं भरली आहेत. जायकवाडीला पाणी देण्याचे टेंन्शनही कमी झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतक-यांना आवर्तन देणे शक्य झाले. रब्बी हंगामालाही दिलासा देता आला. नोव्हेंबरमध्ये सुध्दा एखादे आवर्तन देण्याबाबत जलसंपदा विभागाने विचार करावा असे त्यांनी सुचित केले. राज्यातील युती सरकारने सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ शेतकरी आणि महिलांना होत असून, कापूस, सोयाबीनसाठी दिलेले अर्थसहाय्यही शेतक-यांना उपलब्ध झाले आहे.