मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे राज्यात मोठा सत्ताबादल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान कलगितुरा रंगला आहे. मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्यांच्या फाईल्स उघडल्या गेल्याने त्यांनी पक्षाविरोधात गद्दारी केली. घोटाळे आणि लफडी तुम्ही केली आणि त्यापासून वाचण्यासाठी पक्षप्रमुखांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आदित्य यांनी १२ खासादारांनी शिंदे गटाला पाठींबा दिल्यानंतर बोलताना ही टीका केली आहे.
शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली असून, त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली़ राज्यातील शिंदे गट-भाजपच्या युती सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे.