रिअल इस्टेट

शहरामध्ये प्लॉट, घर खरेदीमध्ये पैसे गुंतवा, पण त्या अगोदर ‘या’ गोष्टी डोक्यात ठेवा! तरच राहाल फायद्यात, नाहीतर…..

Real Estate Investment tips:- तुम्ही देशातील कोणत्याही शहरांमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जर घर किंवा फ्लॅट तसेच प्लॉट विकत घेत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रॉपर्टीचे व्यवहार करताना खूप बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते. कारण आपल्याला माहित आहे की अशा व्यवहारांमध्ये बऱ्याचदा फसवणुकीच्या घटना समोर येतात.

यामध्ये एकच मालमत्ता एकापेक्षा जास्त जणांना विक्री करणे किंवा प्रॉपर्टी दुसऱ्याच्याच नावावर असून तिसऱ्यानेच विकणे अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीच्या पद्धती आपल्याला यामध्ये दिसून येतात.

घर घेणे किंवा प्लॉट घेणे याकरिता खूप मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते व इतका पैसा गुंतवून जर काही प्रकारे फसवणूक झाली तर मात्र पैसाही जातो आणि पश्चाताप करायची वेळ येते.

त्यामुळे तुम्ही कोणत्याही शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असाल तर काही गोष्टी तपासून पाहणे खूप गरजेचे असते व त्यामुळे भविष्यात होणाऱ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. त्यामुळे फ्लॅट किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची तुम्ही बुकिंग करत असाल तर त्या अगोदर काही महत्त्वाचे कागदपत्रे तपासली पाहिजेत व असे करणे हे तुमच्या फायद्याचे ठरते.

 प्रॉपर्टीत पैसा गुंतवा परंतु या गोष्टींची काळजी घ्या

1- मालमत्तेची मूळ कागदपत्रे तपासणे एखाद्या प्रॉपर्टीचा खरा मालक नेमका कोण आहे हे तुम्हाला त्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रावरूनच स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे फ्लॅट किंवा प्लॉट किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना मालकाकडून मूळ कागदपत्रे मागून ते व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे असते.

नंतर तुम्ही जेव्हा बुकिंग करता तेव्हा तुम्ही त्या कागदपत्रांची फोटोकॉपी देखील मागू शकता. या कागदपत्रांमध्ये या अगोदर ती मालमत्ता किती वेळा विकली गेली आहे आणि कोणी विकत घेतली आहे,

तसेच शीर्षक व विक्री करार, जमिनीचा वापर तसेच पूर्वीच्या देयकांच्या मूळ पावत्या, ताबा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांचा समावेश यामध्ये असतो. अशा प्रकारची कागदपत्रे तपासण्यासाठी तुम्ही वकील किंवा या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन पडताळणी करू शकतात.

2- मालमत्तेचे शीर्षक म्हणजे टायटल तपासणे मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये शीर्षक हे संबंधित मालमत्तेचा मालक कोण आहे हे सुचित करत असते व त्या व्यक्तीलाच मालमत्ता विकण्याचा अधिकार देखील मिळतो.

एखादा व्यक्ती मालमत्तेवर दावा करत असेल तर त्या व्यक्तीने मालमत्तेवर मालकी हक्क कसा मिळवला? त्याने ती स्वतःच्या पैशाने खरेदी केली आहे का? व्यक्ती मालमत्तेचे सहमालक आहे की वडिलोपार्जित मृत्युपत्र,

गिफ्ट किंवा इतर कोणत्या मार्गाने वारसा हक्काने मालमत्ता मिळाली आहे का? हे जाणून घेणे खूप गरजेचे असते. यामध्ये शीर्षक म्हणजेच मालकी पूर्णपणे बरोबर असेल तरच त्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावी. थोडासा जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही अशी मालमत्ता खरेदी करूच नये.

3- विक्रेत्याची माहिती मिळवणे मालमत्तेची मालकी हक्क कोणाचा आहे हे तुम्हाला समजल्यानंतर संबंधित विक्रेत्याची संपूर्ण माहिती गोळा करावी. यामध्ये या मालमत्तेवर दुसरा कोणी सह मालक आहे का याबद्दल तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीला विचारणे गरजेचे आहे.

कोणी सह मालक असेल तर सर्व सदस्यांचे संमती घेणे गरजेचे असते. ज्या व्यक्तीकडून तुम्ही मालमत्ता खरेदी करत आहात तो मानसिक दृष्ट्या आजारी तर नाही ना याची देखील खात्री करा.

कारण अशा व्यक्तीसोबत केलेला करार तुम्हाला अडचणीत आणू शकतो. त्यामुळे मानसिक दृष्ट्या निरोगी व्यक्ती असेल त्याचीच मालमत्ता खरेदी करण्याला प्राधान्य द्या.

4- विक्री करार करा या प्रकारची कागदपत्रे व विक्रेत्याची देखील पडताळणी करून झाल्यानंतर विक्री करार करून घेणे गरजेचे असते. या करारामध्ये विक्रेत्याकडून कोणत्या अटींवर आणि कोणत्या किमतीला मालमत्ता खरेदी करणार आहात याबाबत सर्व काही माहिती नमूद करावी.

खरेदी विक्री करारामध्ये मालमत्तेचा आकार आणि त्याचा वापर यासारख्या गोष्टी देखील नमूद करणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही विक्री करार किंवा विक्री पत्र बनवाल तेव्हा दस्तऐवज एकतर्फी असू नये याची काळजी घ्यावी.

5- ताबा प्रमाणपत्र आणि पडताळणी मालमत्ता खरेदीसाठी अंतिम रक्कम जेव्हा तुम्ही भराल तेव्हा त्या अगोदर ज्या व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी करत आहात त्याच व्यक्तीच्या ताब्यात मालमत्ता असल्याची खात्री करा.

एखाद्या मालमत्तेत भाडेकरू राहत असेल तर तुमच्या नावावर नोंदणी करण्यापूर्वी विक्रेत्याला मालमत्ता रिकामी करण्यास सांगा. नंतर मालमत्ता खाली झाली आणि विक्रेत्याच्या ताब्यात आल्याची खात्री करा व नोंदणी होताच मालमत्तेचा ताबा घ्या.

6- मालमत्तेचा अगोदरचा विक्री इतिहास म्हणजे सेलिंग चेन तपासा कोणतीही मालमत्ता तुम्ही विकत घ्याल त्या अगोदर यापूर्वी ती मालमत्ता किती वेळा विकली गेली आणि कोणत्या लोकांनी ती खरेदी केली याची माहिती मिळवा.

ही माहिती तुम्हाला त्या मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या पूर्वीच्या कागदपत्रावरून सहजपणे कळते. कारण संबंधित मालमत्तेची मालकी कुणाची आणि किती काळासाठी होती याची माहिती मिळवणे तुमच्यासाठी चांगले राहते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts