रिअल इस्टेट

मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घर विकत घेऊन राहावे की भाड्याने! वाचा याचे फायदे-तोटे

बरेच व्यक्ती नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये राहतात. त्यातल्या त्यात अशा शहरांमध्ये स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु जेव्हा आपण नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घरापासून लांब जातो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी घर हवे असते व या माध्यमातून आपल्या मनात विचार येतो की घर स्वतःच्या असावे की भाड्याच्या घरात राहावे?

यामध्ये अनेक मतमतांतरे आहेत. तुम्ही जर स्वतःचे घर घेतले तर त्याचे काही फायदे आणि काही तोटे देखील आहेत  व अगदी त्याच पद्धतीने भाड्याच्या घरात राहायचे ठरवले तरी त्याचे देखील फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे या दोन्ही बाबींचा तुलनात्मक दृष्टिकोनातून माहिती घेणे खूप गरजेचे आहे.

 घर विकत घेऊन राहणे फायदेशीर का भाड्याने घेऊन राहणे जास्त फायदेशीर

 स्वतःचे घर असण्याचे फायदे

1- स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व स्वतःचे घर घेतले गेले की एक स्वप्नपूर्तीचा आनंद आणि समाधान मनाला लागते. जीवनामध्ये एक स्थैर्याची भावना निर्माण होते. काही झाले तरी आपल्याकडे आपली स्वतःचे घर आहे या विचाराने व्यक्ती व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये काही धाडसी पावले देखील उचलू शकतो.

2- स्वतःकडे थोडीशी रक्कम असेल तर ती गुंतवून आणि बँकेकडून होम लोन घेऊन तुम्ही घर घेऊ शकतात. परंतु यामध्ये बँकेचा ईएमआय नियमितपणे भरणे खूप गरजेचे असते. सध्या होम लोनचे व्याजदर कमी झाल्यामुळे नोकरदार वर्गाला स्वतःचे घर घेता येणे शक्य झाले आहे.

3- होम लोनवर तुम्ही जे काही हप्ते फेडतात त्यासाठी व्याज भरावे लागते व त्या व्याजावर इन्कम टॅक्स मधून देखील सूट मिळते. अगदी गुंतवणूक म्हणून तुम्ही स्वतःचे घर घेतले तरी देखील त्यासाठी भरावे लागणारे हप्त्यांवर इन्कम टॅक्स मधून सूट मिळू शकते.

4- स्वतःचे घर घेण्यामागे अजून एक लोकांचा मतप्रवाह दिसून येतो व तो म्हणजे घराचे भाडे भरून घर मालकाचा फायदा करून देण्यापेक्षा हीच रक्कम जर होम लोनचा हप्ता म्हणून वापरून त्या माध्यमातून स्वतःच्या नावावर एखादी वास्तू करून घेणे फायद्याचे ठरते.

5- स्वतःच्या घरामध्ये व्यक्ती हव्या त्या पद्धतीने बदल करू शकतो किंवा कोणत्या सुविधा निर्माण कराव्यात हे आपण स्वतः ठरवू शकतो. भाड्याच्या घरात मात्र याबाबतीत मर्यादा येतात.

6- नोकरी व्यवसायामध्ये काही उतार चढाव आले तरीदेखील स्वतःचे घर असल्यामुळे आपण जास्त काळजी करत नाही.

7- स्वतःचे घर असल्यामुळे भाडेकरार संपला की घर बदलणे किंवा वारंवार सामान या घरातून त्या घरात शिफ्ट करणे या गोष्टींचा मनस्ताप आपल्याला होत नाही.

 स्वतःचे घर घेण्याचे तोटे

1- आजकालचे युवक नोकरी बदलताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये नोकरी बदलण्याचा किंवा राहण्याचे ठिकाण बदलण्याकडे जास्त कल दिसतो. अशा प्रसंगी स्वतःचे घर जर असले तर ते वारंवार बदलणे शक्य होत नाही.

त्यामुळे नोकरी बदलली व नोकरीची ठिकाण जर आपल्या राहत्या घरापासून दूर गेले तर प्रवासाचा वेळ आणि खर्च देखील वाढतो. त्यातल्या त्यात दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या शहरात नोकरी  मिळाली तर स्वतःचे घर एक तर बंद व्हावी लागते किंवा ते भाड्याने देऊन दुसरीकडे जाऊन राहावे लागते.

2- स्वतःचे घर असले की त्याचा मेंटेनन्स भरण्याची तसेच ते घर व्यवस्थित ठेवण्याची सर्व जबाबदारी स्वतःवर येऊन पडते.

3- होम लोनसाठी भरावी लागणारी सुरुवातीची रक्कम आणि दर महिन्याला भरावा लागणार हप्ता यामुळे तुमच्या पगारातील बराच भाग हा कापला जातो. त्यामुळे भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे पैसा उरत नाही.

4- कमी पगाराची नोकरी असलेली व्यक्ती किंवा ज्यांची नोकरी टिकेल याची हमी नाही अशा लोकांना स्वतःचे घर घेतले तर काही परिस्थितीमुळे होम लोनचा हप्ता भरणे कठीण होऊन जाते.

 घर भाड्याने घेतले तर

मिळणारे फायदे

1- भाड्याच्या घरात राहण्याचा सगळ्यात प्रमुख फायदा म्हणजे तुम्हाला हव्या त्या परिसरामध्ये घर भाड्याने घेता येणे शक्य होते. एखादी शाळा किंवा हॉस्पिटल पासून जवळ किंवा मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी तुम्हाला भाड्याने घर घेता येणे शक्य होते.

2- तुमची नोकरी किंवा व्यवसायाची जागा बदलल्यानंतर तुम्हाला भाड्याचे घर बदलणे सहज शक्य होते. परंतु त्या तुलनेत स्वतःचे घर असेल तर ते बदलता येत नाही. त्यामुळे आजकालच्या तरुणांसाठी स्वतःचे घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायद्याचे ठरू शकते. कारण तरुण खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या बदलतात.

3- तुम्हाला घराचे भाडे भरावे लागते परंतु तरी देखील होम लोन ची सुरुवातीची गुंतवणूक आणि त्यासाठी जाणारा प्रत्येक महिन्याला मोठा हप्ता या प्रकारचा आर्थिक भार तुमच्यावर पडत नसल्यामुळे घर भाडे भरून पगारातील जी रक्कम उरेल ती तुम्ही गुंतवणुकीसाठी वापरू शकतात.

4- तसेच भाड्याच्या घरात राहत असताना तुम्हाला त्या घराच्या मेंटेनेस ची जबाबदारी हव्या त्या प्रमाणात तुमच्यावर राहत नाही. तुम्हाला जर त्या घरामध्ये काही समस्या उद्भवल्या तर तुम्ही सहजपणे ते घर सोडून दुसरीकडे घर घेऊ शकतात.

 भाड्याच्या घरात राहण्याचे तोटे

1- सगळ्यात मोठा तोटा म्हणजे संबंधित घराचा भाडेकरार संपला की तुम्हाला ते घर बदलावे लागते. तुम्ही जर एखाद्या जागी सेटल झालेल्या आहात परंतु घर भाड्याने असल्यामुळे तुम्हाला भाडे करार संपला की तेच ठिकाण सोडून नवीन ठिकाणी जाणे भाग पडते.

2- कायमच भाड्याच्या घरामध्ये राहिले तर स्वतःचे घर घेणे शक्य होत नाही. जर तुमची रिटायरमेंट झाली आणि एका जागे तुम्हाला सेटल व्हायचे असेल तर मात्र त्यावेळेस जास्त पैसे देऊन तुम्हाला घर घ्यावे लागू शकते. यामध्ये जर तुम्ही अगदी सुरुवातीच्या काळात घर घेतले तर कमीत कमी गुंतवणूक करून तुम्ही जागा घेऊन ठेवली तर निवृत्तीनंतर सेटल होण्याची चांगली सोय होते.

3- तसेच भाड्याच्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे कुठल्याही सोयीसुविधा करून घेता येत नाही.

4- घरमालकाने नोटीस दिल्यास तुम्हाला भाड्याचे घर सोडून दुसरीकडे जाण्याची तयारी सतत ठेवावी लागते. म्हणजे ज्यामुळे एक प्रकारचे अस्थिर जीवन माणूस जगत असतो. त्या तुलनेत स्वतःच्या घरामध्ये एक प्रकारचे स्थैर्य असते.

यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे कमीत कमी पगार असलेल्या लोकांनी तातडीने गृहकर्जाची जबाबदारी डोक्यावर न घेता भाड्याच्या घरात काही वर्ष राहावे आणि स्थिर झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचा विचार करावा.

Ajay Patil

Recent Posts