Real Estate:- बरेच व्यक्ती नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून काबाडकष्ट करून पैसे कमवतात आणि एखाद्या शहरांमध्ये प्लॉट किंवा फ्लॅट खरेदी करतात. कारण बऱ्याच जणांची शहरांमध्ये प्लॉट किंवा फ्लॅट किंवा एखादी मालमत्ता स्वतःची असावी हे स्वप्न असते. याकरिता आपण अशा बाबतीत एखाद्या बांधकाम व्यवसायिक किंवा इस्टेटच्या माध्यमातून अशा पद्धतीचे व्यवहार पूर्ण करत असतो.
reपरंतु अशा पद्धतीची मालमत्ता खरेदी करताना मात्र काही गोष्टींची सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे असते. कारण प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी आपण कायदेशीर कचाट्यात अडकू शकतो आणि आपला पैसा देखील वाया जाऊ शकतो. म्हणून एखाद्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट किंवा प्लॉट बुक करत असाल तर त्या अगोदर त्या संबंधीच्या काही महत्त्वाच्या गोष्टींची चाचपणी करून घेणे खूप गरजेचे ठरते.
शहरामध्ये प्लॉट किंवा फ्लॅट घ्या परंतु या गोष्टी तपासा
1- संबंधित मालमत्तेची मूळ कागदपत्रे तपासणे– एखाद्या मालमत्तेचा खरा मालक कोण आहे हे आपल्याला त्या मालमत्तेच्या कागदपत्रावरून कळत असते. त्यामुळे एखादा फ्लॅट किंवा मालमत्ता खरेदी करताना मालकाकडून त्यासंबंधीची मूळ कागदपत्रे मागणे गरजेचे आहे. या कागदपत्रात प्रामुख्याने विक्री करार, त्यासोबतच संबंधित मालमत्ता किती वेळा विकली गेली आणि कोणी विकत घेतली आहे या संबंधीचे कागदपत्रे, मालमत्तेचे शीर्षक तसेच जमिनीचा वापर आणि ताबा प्रमाणपत्रासारखे कागदपत्रे मागून ती वकिलांच्या मार्फत तपासणे गरजेचे आहे.
2- टायटल म्हणजे शीर्षक तपासणे– प्रॉपर्टीच्या खरेदी विक्री व्यवहारांमध्ये शीर्षकाला खूप महत्त्व आहे. कारण संबंधित मालमत्तेचे शीर्षक म्हणजे टायटल हे मालमत्ता चा मालक कोण आहे हे आपल्याला सुचित करत असते व ती मालमत्ता विकण्याचा अधिकार संबंधित मालकास मिळत असतो. जर एखादा व्यक्ती संबंधित मालमत्तेवर दावा करत असेल तर त्याने मालमत्तेवर मालकी हक्क कसा मिळवला म्हणजेच त्याने ती मालमत्ता स्वतःच्या पैशाने खरेदी केली आहे का? किंवा ती व्यक्ती मालमत्तेची सहमालक आहे की वडीलोपार्जित मृत्युपत्र, गिफ्ट किंवा इतर कोणत्या मार्गाने मालमत्ता मिळाली आहे का वारसाहक्काने मिळाली आहे इत्यादी जाणून घेणे गरजेचे असते. शीर्षक म्हणजेच मालकी जर बरोबर असेल तर त्या ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
3- विक्रेत्याची माहिती गोळा करूणे– मालमत्तेचे शीर्षक तपासणीनंतर विक्रेत्याची माहिती देखील गोळा करणे गरजेचे आहे. संबंधित प्रॉपर्टीवर कोणी सह मालक आहे का याबाबत थेटपणे विचारणा करणे फायद्याचे ठरते. यामुळे तुम्हाला इतर सर्व सदस्यांची संमती घ्यावी लागते. महत्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्या मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तीकडून तर मालमत्ता खरेदी करत नाहीत ना? याबद्दल देखील माहिती करणे गरजेचे आहे. कारण असा करार तुम्हाला अडचणीत आणू शकतो.
4- विक्री करार तयार करणे– प्रॉपर्टी घेताना विक्रेत्याकडून ती कोणत्या अटींवर आणि कोणत्या किमतीला खरेदी करणार आहात हे सर्व काही विक्री करारामध्ये नमूद करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीच्या करारामध्ये मालमत्तेचा आकार आणि वापर यासारख्या गोष्टी नमूद करणे देखील गरजेचे आहे. विक्रीपत्र जेव्हा बनवाल तेव्हा त्यासंबंधीचे दस्तऐवज एकतर्फी असू नये याची काळजी घ्यावी.
5- सेलिंग चेन तपासणे– एखादी मालमत्ता विकत घेण्यापूर्वी ती मालमत्ता या अगोदर किती वेळा विकली गेली आहे आणि कोणत्या व्यक्तीने ती खरेदी केली याची देखील माहिती मिळवणे गरजेचे आहे. ही माहिती तुम्हाला मालमत्तेच्या खरेदी विक्रीपूर्वीच्या कागदपत्रावरून मिळते. तसेच मालमत्तेचे मालकी कोणाची आणि किती कालावधी करिता राहील याची देखील माहिती मिळवणे फायद्याचे ठरेल.
6- ताबा प्रमाणपत्र– जेव्हा तुम्ही मालमत्ता खरेदी कराल व त्याकरिता अंतिम रक्कम भराल तेव्हा त्या अगोदरच्या व्यक्तीकडून तुम्ही ती मालमत्ता खरेदी करत आहात त्या व्यक्तीच्या ताब्यात संबंधित मालमत्ता असल्याची खात्री करावी. एखाद्या मालमत्तेमध्ये जर भाडेकरू राहत असेल तर त्या मालमत्तेचे तुमच्या नावावर नोंदणी करण्यापूर्वी विक्रेत्याला मालमत्ता रिकामी करण्यास सांगावी व मालमत्ता खाली झाल्यानंतर ती संबंधित विक्रेत्याच्या ताब्यात असल्याची खात्री करावी. नोंदणी होताच तुम्ही तुमच्या मालमत्तेचा ताबा घ्यावा.