Real Estate Tips:- आपल्यापैकी बरेच व्यक्ती मोठ्या शहरांमध्ये फ्लॅट खरेदी करतात. कारण अशा मोठ्या शहरांमध्ये आपले स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते म्हणून बरेच व्यक्ती आपल्या कष्टाने कमावलेला पैसा फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यासाठी लावतात व बाकीचे होम लोन सारखा पर्याय निवडून स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.
परंतु बऱ्याचदा यामध्ये आपण पुरेशी माहिती घेत नाहीत व नंतर मात्र आपली फसवणूक होते व आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान तर सहन करावेच लागते परंतु मानसिक त्रास देखील मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणून घर खरेदी करत असताना आपण आपल्या कष्टाने जमा केलेला पैसा फ्लॅट किंवा घर खरेदीमध्ये टाकतो तेव्हा मात्र आपण काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. त्यामुळे घर किंवा फ्लॅट खरेदी करत असताना कोणत्या गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
फ्लॅट किंवा घर खरेदी करा परंतु या गोष्टी तपासा
1- संबंधित इमारतीच्या बांधकामाला मंजुरी आहे का?- तुम्हाला ज्या इमारतीमध्ये फ्लॅट विकत घ्यायचा आहे किंवा घर ज्या ठिकाणी बांधले आहे ही जागा नेमकी कशी आहे? म्हणजे त्या जागेवर काही सरकारी थकबाकी नाही ना? ही गोष्ट अगोदर तपासून घेणे गरजेचे आहे. तसेच ती इमारत ज्या जमिनीवर उभी आहे
जमिनीच्या बाबतीत काही कायदेशीर वाद किंवा अडचणी आहेत का? तसेच त्या जागेवर बांधकाम करणाऱ्या बिल्डर्सने आवश्यक त्या मंजूऱ्या मिळवल्या आहेत का हे देखील बघणे तितकेच गरजेचे आहे. यासंबंधीची माहिती तुम्हाला निबंधक क्षेत्र विकास प्राधिकरण, पाणीपुरवठा, वीज मंडळ आणि महापालिका यांच्याकडे मिळू शकेल.
2- संबंधित बिल्डरची माहिती घेणे गरजेचे– जेव्हा तुम्ही फ्लॅट किंवा घर खरेदी करतात व त्याकरिता एखाद्या बँकेकडे कर्ज घ्यायला जातात तेव्हा संबंधित बँका त्या बिल्डरच्या प्रकल्पाची चौकशी करतात. त्यामध्ये बिल्डर कोणता आहे व त्याची प्रतिष्ठा कशा प्रकारची आहे? या गोष्टी तपासूनच बँकांकडून होम लोन दिले जाते. त्यामुळे बिल्डर बाबत माहिती असणे गरजेचे आहे.
3- महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांची संबंधित जागेचा नकाशाना मंजुरी आहे का?- इमारत ज्या ठिकाणी बांधली गेली आहे त्या जागेच्या सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड यांची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे. त्या बिल्डरला कुलमुखत्यार पत्र देण्यात आले आहे का हे सुद्धा तपासणे महत्त्वाचे आहे.
तसेच अधिकार पत्र व त्या जमिनीचा किंवा इमारतीचा बाबा प्रत्यक्षरीत्या बिल्डरकडे आहे का? बांधकामाचे नकाशे महापालिका किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाले आहे का याची देखील पाहणी करावी.
4- एनए परवानगी– तुम्ही एखादा फ्लॅट खरेदी करत असाल तर तो मंजूर करण्यात आलेल्या नकाशात आहे का आणि जर असेल तर त्याचा एरिया नेमका कुठे आहे? या गोष्टींची माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच संबंधित फ्लॅट किंवा ज्या इमारतीत आहेत त्या इमारतीची जागा एनए परवानगीत आहे का किंवा त्या संबंधीची परवानगी घेण्यात आली आहे की नाही हे देखील तपासणे गरजेचे आहे.
5- कार्पेट एरिया आणि किंमत– तुम्ही जी मालमत्ता किंवा फ्लॅट खरेदी करणार आहात त्याची किंमत व ज्या ठिकाणी तुम्ही फ्लॅट खरेदी करत आहात त्या ठिकाणी असलेल्या इतर फ्लॅट किंवा मालमत्तेची किंमत किती आहे इत्यादीची माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे फ्लॅट किंवा घर खरेदी करत असाल तर कार्पेट एरिया किती आहे हे पहावे.
अशा चार ते पाच महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तपासून जर फ्लॅट किंवा घर खरेदी केले तर तुम्ही होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून स्वतःला वाचवू शकतात.