उमेदवारी अर्ज भरायला पैसे नाहीत, निवडणूक लढायलाही पैसे नाहीत, म्हणत निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र या गोष्टीला तीन महिनेही पूर्ण होत नाही तोच, नगर शहरात निलेश लंके प्रतिष्ठानने 33 लाख 33 हजारांची भव्य दहिहांडी आयोजित केली. शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. माजी नगरसेवक प्रदिप परदेशी यांनी या दहीहंडी कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे खा. लंकेंनी स्वतः सांगितले. मात्र, दहीहंडी सारख्या कार्यक्रमाला हा 33 लाखांचा खर्च म्हणजे खूपच जास्त असल्याचे सामान्य नगरकरांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमातच कालीचरण महाराज हे शिवतांडव नृत्यही करणार आहेत. आता हा एवढा मोठा पैसा कशासाठी खर्च करायचाय आणि हे शिवतांडव नृत्य नेमके कशासाठी आयोजित करण्यात आलंय, हे दोन प्रश्न नगरकरांना पडले आहेत.
मी फकीर आहे, म्हणत निलेश लंकेंनी खासदारकीची निवडणूक लढवली. सामान्यांच्या भावनेला हात घातल, निवडणूक जिंकली. अगदी निवडणुकीचा अर्ज भरतानाही आपल्याकडे पैसे नसल्याने साध्या पद्धतीने आपण अर्ज भरत असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होतं. आता ही निवडणूक होऊन तीन महिने होत आले असतानाच, निलेश लंके प्रतिष्ठान थेट 33 लाख 33 हजार 333 रुपये बक्षिस असणारी दहीहांडी आयोजित करतो म्हटल्यावर, नगरकरांचे डोळे पांढरे झाले. मी फिरतो ती महागडी गाडी माझी नाही म्हणत, निलेश लंके यापूर्वी त्या गाडीच्या मालकाचे नावही सांगितले होते.
तसेच हे 33 लाख रुपयेही कार्यकर्त्यांकडूनच खर्च केले जाणार आहेत, हे निलेश लंके कदाचित सांगतीलही. मात्र प्रश्न हा आहे की, दहीहंडी उत्सवावर एवढा खर्च करण्यापेक्षा त्याच 33 लाखांत नगर शहरातल्या एखाद्या प्रभागातला रस्ता, वीज किंवा पाण्याचा प्रश्नही सुटू शकला असता, अशीही कुजबूज सामान्यांतून होताना दिसत आहे. कदाचित आगामी विधानसभांपूर्वी आपल्या मतदारांना खूश करण्यासाठी एखाद्या इच्छुकानेही हा खर्च केला असण्याची शक्यता आहे. मात्र पैशाची एवढी उधळपट्टी करण्यापेक्षा एखाद्या विधायक कामांवर हा खर्च केला असता तर जनता यापेक्षा नक्कीच जास्त खूश झाली असती, असेही काहींचे म्हणणे आहे.
मध्यंतरी रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात वादंग झाला. त्यावेळी निलेश लंके यांनी महाराजांनी असे वक्तव्य करायला नको होते, असं म्हणत या वादात स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती. नगर शहरात पत्रकारांनी रामगिरी महाराजांबाबत लंके यांना प्रश्न विचारल्यावर लंके यांनी हे उत्तर दिलं होतं. शिवाय रामगिरी महाराजांनी दुसऱ्याच्या धर्माबद्दल बोलायला नको होतं, असंही स्पष्ट केलं. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा, आपली रेष मोठी करा ना.. असा थेट सल्ला खा. लंकेंनी दिला होता.
लंके या वक्तव्यानंतर महाराजांच्या भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. रामगिरी महाराज हे लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. लंके यांना महाराजांची भूमिका असमहत वाटल्यानंतर या भक्तांमध्ये लंकेविषयी रोष पसरणं सहाजिक होतं. आता दहिहंडीच्या कार्यक्रमात लंके हे, हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या कालीचरण महाराजांना आमंत्रित करत आहेत. या कार्यक्रमात कालीचरण महाराज शिवतांडव नृत्यही करणार आहेत. हिच बाब विरोधकांनी हेरली.
एकीकडे रामगिरी महाराजांबाबत वक्तव्य करुन हिंदूंच्या भावना दुखवायच्या व दुसरीकडे कालीचरण महाराजांना आणून पुन्हा राजकीय पोळी भाजायची, हे पाहिल्यावर लंके हे पक्के राजकारणी झाल्याचा आरोप विरोधकांकडून होताना दिसतोय. लंकेंनी मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेविरोधात आंदोलन केलं होतं. मात्र ज्या मुद्द्यावर हे आंदोलन झालं होतं, त्या मुद्यांवर अजून ठोस समाधान मिळालेलं नाही, मग या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं, हा प्रश्नही आहेच. या प्रश्नावरआपण मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही, असं खासदारसाहेब वारंवार सांगतात. पण हे सांगावं लागणं, हेच अनेकांना खटकणारं आहे.
खासदार म्हणून लंके हे पहिल्यांदाच निवडून आलेत. कदाचित नवीन असल्याने निधी, प्रश्न, व्यवस्था, अधिकारी हे सगळं समजायला वेळ लागेल. ज्या मुद्यांवर लंके यांना सामान्यांनी निवडून दिले त्याच मुद्यांचं लगेच उत्तर मिळणार नाही. पण दहीहंडी सारख्या कार्यक्रमावर एवढा पैसे खर्च करणं, खरंच गरजेचं आहे का, हा प्रश्नही अयोग्य नक्कीच नाही..