सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय शासनाच्या माध्यमातून घेतले जात आहेत.
यामध्ये काही नवीन रेल्वे प्रकल्पांना मान्यता देण्यापासून तर इतर क्षेत्रातील निर्णयाचा देखील यामध्ये समावेश आहे. याच पद्धतीने गेल्या कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेला नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.
यासंबंधीची माहिती खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे. या नदी जोड प्रकल्पामध्ये राज्यातील महत्वाच्या दोन नद्या जोडल्या जाणार आहेत व त्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून तब्बल सात हजार पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली.
नार–पार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मान्यता
नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प हा गेल्या तीन ते चार दशकापासून प्रलंबित असलेला प्रकल्प असून आता या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून याकरिता तब्बल 7 हजार पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम वाहिनी असलेल्या नार पार गिरणा या नदी खोऱ्यातून सुमारे 10.64 टीएमसी पाणी वापर प्रस्तावित असून त्याचा लाभ राज्यातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील जवळपास 49 हजार 516 हेक्टर शेती क्षेत्राला होणार आहे.
नारपार नाशिक जिल्ह्यामधील पेठ व सुरगाणा तालुक्यामधील नद्या असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. त्यामुळे हे वाया जाणारे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून गिरणा नदीत टाकण्यासाठी महत्वाची नारपार गिरणा नदीजोड योजना आहे. याकरिता साडे सहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कळवण,
सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यांना फायदा होणार असून जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव तसेच अमळनेर, चाळीसगाव, भडगाव व पाचोरासह इतर तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊन शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील काही भागाला देखील फायदा होईल असे देखील बोलले जात आहे.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिले मंजुरीचे पत्र
केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या मंजुरीचे पत्र राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांनी राज्य सरकारला दिले असून हेच पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले आहे. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे
की नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला माननीय राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली असून मी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये नमूद केल आहे.