7th Pay Commission : महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खरेतर, रक्षाबंधन किंवा कृष्ण जन्माष्टमीला सरकार त्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट देईल अशी अपेक्षा होती. पण, रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर याबाबतचा निर्णय काही होऊ शकला नाही.
पण, आता महागाई भत्ता वाढीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. यावेळी सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करू शकते, असे बोलले जात आहे. खरंतर, मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित झाला होता.
मार्चमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% झाला. विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली.
गेल्या वेळी महागाई भत्तामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली असल्याने जुलै महिन्यापासूनही महागाई भत्ता चार टक्क्यांनीच वाढणार अशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांना होती.
पण यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सप्टेंबर महिन्यात तीन टक्क्यांनी वाढवला जाणार आहे, अर्थातच हा भत्ता 53% एवढा होणार आहे.
याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर महिन्यात घेतला जाणार असला तरी देखील ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा देखील लाभ दिला जाणार आहे.
यामुळे दिवाळीच्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार आहे. सणासुदीच्या काळात केंद्रातील सरकारच्या या निर्णयाचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
आठवा वेतन आयोगाबाबतही निर्णय होणार
यासोबतच आगामी काळात आठवा वेतन आयोगाबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे.
सध्याचा वेतन आयोग 2016 पासून लागू असून येत्या दोन वर्षांनी अर्थातच 2026 मध्ये नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.
तत्पूर्वी मात्र आठवा वेतन आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. यामुळे आगामी काळात आठवा वेतन आयोगाबाबत मोठी घोषणा होऊ शकते असे बोलले जात आहे.