7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% करण्याबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याचा निर्णय घेतला.
आधी हा महागाई भत्ता 50% एवढा होता. मात्र ऑक्टोबर 2024 मध्ये महागाई भत्ता 53% झाला असून ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा देण्यात आली.
दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 53% करणे अपेक्षित आहे. मात्र मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता अन त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी होत असणारा गोंधळ या सर्व बाबीमुळे अजून पर्यंत याबाबतचा निर्णय होऊ शकलेला नाही.
पण राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने सरकारला एक निवेदन पाठवले आहे. हे निवेदन राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे , शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सुरज पांढरे यांना देण्यात आले आहेत.
या निवेदनात एक जुलै 2024 पासून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्तामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 3% वाढ करावी आणि याबाबतचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या पगारात याचा लाभ मिळावा, असेही या निवेदनात म्हटले गेले आहे.
राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारात म्हणजेच जो पगार जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात येईल त्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ वितरित करण्यात यावा अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली असून त्यामुळे सरकार या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेईल असे बोलले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा निर्णय डिसेंबर महिन्यात होणार असला तरी देखील ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे.