7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% केला.
यासंदर्भातील निर्णय केंद्रातील सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये घेतला मात्र ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे. यामुळे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आली.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% डीए मिळावा याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भातील निवेदन पत्र नुकतेच सादर करण्यात आले असून लवकरात लवकर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ द्यावा अशी विनंती देखील संघटनेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले आहे.
या निवेदन पत्रात महासंघाकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दि. १ जुलै, २०२४ पासून ३ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, त्यानुसार केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांना महागाई भत्ता ५०% वरुन ५३% झाला आहे.
केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य शासनाचे प्रचलित धोरण असल्यामुळे, राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्तांना देखील केंद्र शासनाप्रमाणे दि. १ जुलै, २०२४ पासून ३% महागाई भत्ता वाढ, घरभाडे भत्ता वाढ तसेच तदनुषंगिक इतर भत्ते थकबाकीसह देण्याचा निर्णय राज्य शासनाने विनाविलंब घ्यावा, अशी अधिकारी महासंघाची आग्रही मागणी करण्यात आली आहे.
नक्कीच महासंघाच्या या निवेदन पत्रावर आता सरकारकडून काय निर्णय घेतला जाणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. तथापि, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे महागाई भत्ता वाढीचा हा निर्णय जुलै महिन्यापासून लागू केला जाणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.